Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ''विदर्भातून थेट कोलंबियापर्यंत''
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
''विदर्भातून थेट कोलंबियापर्यंत'' अँड. दीपक चटप यांचे न्यूयॉर्कमध्ये गगनभेदी भाषण! कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडक...
''विदर्भातून थेट कोलंबियापर्यंत''
अँड. दीपक चटप यांचे न्यूयॉर्कमध्ये गगनभेदी भाषण!
कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी; तरुण वकिल अॅड. चटप यांचे भाषण ठरले विशेष आकर्षण
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
न्यूयॉर्क (दि. 20 एप्रिल 2025) -
        अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील आणि लंडनच्या SOAS विद्यापीठातून कायद्याचे उच्च शिक्षण घेतलेल्या अॅड. दीपक चटप यांना प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे भाषण उपस्थितांना विचारप्रवृत्त करणारे ठरले.

        कोलंबिया विद्यापीठ हेच बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणाचे पहिली पायरी ठरले होते. त्यामुळेच येथे साजरी होणारी त्यांची जयंती जगभरातील अनुयायांसाठी विशेष महत्त्वाची असते. यंदाच्या कार्यक्रमात अमेरिकेचे ख्यातनाम तत्वज्ञ डॉ. कॉर्नल वेस्ट यांनी बीजभाषण केले. तर कार्यक्रमाचे आयोजन कोलंबिया विद्यापीठातील विकास तातड यांनी केले.

        अॅड. दीपक चटप यांनी आपल्या भाषणात भारतीय लोकशाहीच्या तीन स्तंभांबाबत - विधीमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ - महत्वपूर्ण निरीक्षणे मांडली. ते म्हणाले, “या संस्थांनी जनतेसाठी शोषणमुक्त वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. विविधतेचे रक्षण आणि समताधारित धोरणे राबवणे हीच खरी बाबासाहेबांची शिकवण आहे.” त्यांनी आपल्या भाषणात भारतीय लोकशाहीची आकडेवारी, मानवी हक्कांची जागतिक चळवळ, हंगेरीतील रोमा समाजाचे प्रश्न, तसेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांचे धोरण अशा अनेक मुद्द्यांचा अभ्यासपूर्ण ऊहापोह केला. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती, त्यात डॉ. विष्णू माया परियार (न्यू जर्सी), पीएच. डी. स्कॉलर दादासाहेब तांडले (बोस्टन), राम गौतम, कॅप्टन विजय बांबोळे, डॉ. सलाम शेख, लोकशाहीर संभाजी भगत आणि इतरांचा समावेश होता.

        संभाजी भगत यांच्या सादरीकरणाने आणि त्यांच्या संविधान विषयक शैलीने रसिकांची मने जिंकली. विपीन तातड यांच्या रॅपने कार्यक्रमात वेगळाच उत्साह आणला. नवीन कुमार यांच्या कविता ही उपस्थितांचे लक्ष वेधून गेल्या. कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. अनुपमा राव, डाइवर्सिटी डीन जेनी, लेहमन लायब्रेरीचे डायरेक्टर काकोब आणि ग्रंथपाल गॅरी हॉर्समन यांचे विशेष योगदान लाभले. हा कार्यक्रम केवळ एक सांस्कृतिक आणि बौद्धिक सोहळा न राहता, भारतीय संविधानातील मूल्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळणी करणारा मंच ठरला.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top