कोंड्यात ज्वाळांचा कहर ; संध्याकाळचं भयावह रूप
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दिनांक 20 एप्रिल 2025) -
भद्रावतीपासून अवघ्या 600 मीटर अंतरावर असलेल्या कोंडा नाल्याजवळील नवघरे यांच्या शेतात शनिवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या भीषणतेमुळे नागरिक आणि वाहनचालकांमध्ये घबराट निर्माण झाली. शेतातील गवत आणि पालापाचोळा जळू लागल्याने आगीच्या ज्वाळा महामार्गापर्यंत पोहोचल्या. रात्रीच्या अंधारात या आगीने अधिकच धोकादायक रूप धारण केले. महामार्गावरून जाणाऱ्या अनेक वाहनचालकांनी आपली वाहने थांबवून घटनास्थळी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले, यामुळे काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून आयुध निर्माणी आणि नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. सुमारे काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग अखेर नियंत्रणात आणण्यात आली. या सर्व कारवाई दरम्यान तहसीलदार भांडारकर स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. आग नियंत्रणात आल्यावर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.