स्थानिकांना नोकरी न मिळाल्याने संताप
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०७ एप्रिल २०२५) -
राजुरा तालुक्यातील पोवनी गावाजवळील वेस्टर्न कोलफील्ड्सच्या खाणींमध्ये कार्यरत असलेल्या बुद्धा कन्स्ट्रक्शन कंपनीने स्थानिक बेरोजगारांना डावलून परप्रांतीय कामगारांची भरती केल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी केले. रखरखत्या उन्हात शेकडो युवकांनी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या देत काम रोखून धरले. सकाळी ९ वाजता सुरू झालेले आंदोलन तब्बल पाच तास चालले, ज्यामुळे खाणीतले कामकाज पूर्णतः ठप्प झाले. दुपारी ३ वाजता कंपनीच्या व्यवस्थापनाने मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शेतकऱ्यांच्या जमिनी खाण प्रकल्पासाठी अधिग्रहित करूनसुद्धा स्थानिक युवकांना नोकरीपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. याआधी अनेकदा मागणी करूनसुद्धा व प्रशिक्षण (ट्रायल) पूर्ण केलेल्या युवकांना कामावर न घेता बाहेरून मजूर आणले गेले. यावेळी गोवरी उपक्षेत्रीय व्यवस्थापक कुमरैय्या, व्यवस्थापक उदय ब्राम्हणे, कार्मिक व्यवस्थापक हरीश, तसेच बुद्धा कंपनीचे नागराज आणि प्रसाद यांनी आंदोलकांशी चर्चा केली. अखेर आंदोलकांच्या मागण्या मान्य करत ट्रायल झालेल्या युवकांना तात्काळ नोकरी देणे व उर्वरित स्थानिक बेरोजगारांना टप्प्याटप्प्याने सामावून घेणे यावर सहमती झाली. या आंदोलनात पोवनी व आजूबाजूच्या गावांतील युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात निळकंठ कोरांगे, शेषराव बोंडे, प्रभाकर ढवस, दिलीप देठे, विनोद बारसिंगे, कपिल इद्दे, सचिन कुडे, पोवनी सरपंच पांडूरंग पोटे, श्याम काटवले, मारोती लांडे, मंगेश मोरे, महादेव ताजणे, रमेश गौरकार, हरिश्चंद्र जुनघरी, लहू चहारे, हरीदास बोरकुटे, गिरीधर सोनेकर, विशाल जीवतोडे, बंडू कोडापे, विजय मिलमिले, चेतन बोभाटे, किशोर डेरकर, अनिल डाखरे, साईनाथ पिंपळशेंडे, सुरज गव्हाणे, सुमन जंगलीवार, गजानन भोगेकर, अक्षय वैरागडे, आशिष गिरसावळे आदींनी सहभाग घेतला. या आंदोलनात या भागातील शेकडो तरुण व बेरोजगार तरुण सहभागी झाले. आंदोलन शांततेत पार पडले असून सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.