Vidarbha is heating up
विदर्भ तापतोय... विद्यार्थी झळा सहन करतायत!
परीक्षा वेळापत्रकावर त्वरित पुनर्विचार होणे गरजेचे
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ९ एप्रिल २०२५) -
राज्याच्या शिक्षण विभागाने एप्रिल महिन्यात शालेय परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना प्रतिकूल वातावरणाचा सामना करावा लागत असून, विदर्भातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप नेते संजय गजपुरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे. शिक्षण विभागाने इयत्ता १ ते ९ वी पर्यंतच्या वार्षिक परीक्षा व मूल्यमापन एकाच वेळी घेण्याचे आदेश दिले असून, त्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होऊन महिन्याअखेरीस होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी मिळणारा वेळ कमी झाल्याचे सांगितले जात आहे.
![]() |
माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप नेते संजय गजपुरे |
विदर्भात सध्या ४४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवले जात असून, सकाळच्या सत्रात परीक्षा घेण्यात येत असल्या तरी आठ वाजल्यापासूनच उन्हाची दाहकता जाणवते. बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये फॅन व पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रतिकूल परिस्थितीत परीक्षा द्यावी लागत आहे. संजय गजपुरे यांनी निदर्शनास आणले की, चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भात ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी पायी, सायकल किंवा बसने ये-जा करतात. त्यांना परतीच्या वाटेवर प्रखर उन्हाचा सामना करावा लागतो. यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. राज्य शासन एकीकडे उष्माघातापासून संरक्षणासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून जनजागृती करीत असताना, दुसरीकडे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार न करता परीक्षा वेळापत्रक ठरवले आहे, अशी टीका गजपुरे यांनी केली.
"विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ न करता, १५ एप्रिलपूर्वी परीक्षा घेण्याचे नवे सुधारित वेळापत्रक त्वरित जाहीर करावे," अशी स्पष्ट मागणी त्यांनी सरकारकडे केली. तसेच, परीक्षेचा निकाल १ मे रोजी घोषित करण्याच्या नियोजनामुळे शिक्षकांवरही अतिरिक्त ताण येण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. विदर्भाच्या उष्णतेची जाणीव असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.