गडचांदूरमध्ये दोघा मित्रांपैकी एकाचा मृतदेह आढळला
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत
गड़चांदुर (दि. 10 एप्रिल 2025) -
कोरपना तालुक्यातील गडचांदूर परिसरात सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या मागे गुरुवारी सकाळी दोन युवकांमध्ये एकाचा मृतदेह तर दुसरा युवक बेहोश अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत युवकाची ओळख प्रज्वल नवले वय 21, रा. वार्ड क्र. 3, गडचांदूर अशी झाली आहे, तर नागेश लांडगे वय 20, रा. वार्ड क्र. 6, गडचांदूर हा बेहोश अवस्थेत आढळला. दोघेही एकमेकांचे मित्र होते, अशी माहिती समोर आली आहे. प्रारंभिक तपासात दोघांनीही विषप्राशन केल्याचे संकेत मिळत असून, यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही आत्महत्या आहे की हत्या, यावरून परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, नागेश लांडगेला जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. नागेश लांडगेला शुद्धीवर आल्यानंतरच खऱ्या घटनेचा उलगडा होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.