चंद्रपूर सहाय्यक कामगार आयुक्त पदावर नियुक्ती
दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 03 एप्रिल 2025) -
जानेवारी 2023 पासून रिक्त असलेल्या सहाय्यक कामगार आयुक्त पदावर अखेर नियुक्ती करण्यात आली आहे. आशुतोष पाटील यांची सहाय्यक कामगार आयुक्त (Assistant Labor Commissioner) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांना दिशा मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून चंद्रपूर सहाय्यक कामगार आयुक्त पद रिक्त होते. या रिक्त पदाच्या कार्यभारासाठी प्रारंभी नागपूरचे एम.पी. मडावी यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, 27 नोव्हेंबर 2024 पासून त्यांचाही पदभार काढून घेण्यात आला. त्यानंतर गोंदिया जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त राज धुर्वे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, अतिरिक्त प्रभाराच्या धोरणामुळे कामकाजात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असून, येथे कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित होते. विशेषतः चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतर्गत सुरक्षा रक्षक मंडळ, माथाडी मंडळ, तसेच इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या प्रशासकीय कामकाजासाठी पूर्णवेळ अधिकाऱ्यांची आवश्यकता होती. मात्र, प्रभारी अधिकाऱ्यांमुळे निर्णय प्रक्रियेत विलंब होत असल्याने कामगार संघटनांनी वारंवार पूर्णवेळ नियुक्तीची मागणी केली होती.
यासंदर्भात (Bharatiya Mazdoor Sangh) भारतीय मजदूर संघाचे जिल्हा मंत्री पवन ढवळे (Pawan Dhawale) यांनी 14 फेब्रुवारी रोजी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले होते. त्यानंतर मुनगंटीवार यांनी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर (Labor Minister Akash Fundkar) यांना सहाय्यक कामगार आयुक्त आणि सरकारी कामगार अधिकारी पदे त्वरित भरण्याबाबत पत्र पाठवत पाठपुरावा केला. पवन ढवळे यांच्या या मागणीला अखेर यश मिळाले असून, सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून आशुतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल भारतीय मजदूर संघातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले असून, सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्याला अखेर पूर्णवेळ सहाय्यक कामगार आयुक्त मिळाल्यामुळे प्रलंबित कामगार प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. (Former State Minister for Forests, Cultural Affairs and Fisheries MLA Sudhir Mungantiwar)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.