_National Highway 363 (NH-363)_
वरूर (रोड) गावकरी बोगद्याच्या मागणीसाठी रस्त्यावर
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०३ मार्च २०२५) -
वरूर (रोड) गावात जी.आर. कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नव्याने उभारलेल्या भिंतींमुळे गाव दोन भागांत विभागले गेले असून, गावकऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना आणि गुरांना रस्ता ओलांडण्यासाठी जवळपास ८०० मीटर लांब फेरफटका मारावा लागत आहे.
ग्रामस्थांनी याबाबत आमदार देवराव भोंगळे, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र, ठोस तोडगा निघत नसल्याने अखेर ३ मार्च रोजी संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
ग्रामस्थांची प्रमुख मागणी म्हणजे टेंभूरवाही - भेदोडा फाटा - साखरवाही फाटा या मार्गावर योग्य ठिकाणी बोगदा (अंडरपास) तयार करण्यात यावा. यासाठी ३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता वरूर (रोड) बस स्टॉपवर ग्रामस्थांनी आंदोलन केले. नागरिक, युवक आणि ज्येष्ठ मंडळींनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
"विकासाच्या विरोधात आम्ही नाही, पण स्थानिकांना त्रास होणार असेल, तर प्रशासनाने त्यावर उपाययोजना करायला हवी," असे मत आंदोलकांनी व्यक्त केले. प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.