वरुर फाटा येथे धरणे व चक्का जाम आंदोलन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 23 मार्च 2025) -
राजुरा तालुक्यातील वरुर, विरूर, धानोरा, कवीठपेठ, चिंचोली, अंतरंगाव (अन्नूर) या प्रमुख मार्गांना राज्य महामार्ग घोषित करून रुंदीकरण व डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी 3 एप्रिल 2025 रोजी वरुर फाटा येथे धरणे व चक्का जाम आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
हा मार्ग अनेक वर्षांपासून अतिशय नादुरुस्त असून, ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. सद्यस्थितीत या मार्गाची रुंदी केवळ 3.50 मीटर असून, हा मार्ग अंतरंगाव (अन्नूर) पासून 36 किमी अंतरावर शिरपूर (तेलंगणा राज्य सीमा) पर्यंत जातो. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. रस्ता अरुंद असल्यामुळे रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. विशेषतः, गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी नेत असताना मार्गावरच प्रसूती होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. हा परिसर आदिवासी बहुल असल्याने येथील ग्रामस्थांसाठी हा रस्ता जीवनवाहिनी ठरत आहे. तरीही, अनेक वर्षांपासून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांनी एकत्र येत आंदोलनाची तयारी केली आहे.
आंदोलनात विरूर स्टेशनचे सरपंच अनिल आलम, सुबईचे सरपंच सुरेखा आत्राम, डोंगरगाव सरपंच इंदिरा मेश्राम, सिरसी सरपंच मंदा किन्नाके, भेंडाळा सरपंच शंकर आत्राम, टेम्बुरवाही सरपंच रामकृष्ण मडावी, चिचबोडी सरपंच आनंदराव आत्राम, धानोरा सरपंच ज्योत्सना दुर्गे, कविटपेठ सरपंच विजया राठोड, चिंचोली सरपंच पिलाजी भोंगळे, अन्नूर अंतरंगांव सरपंच भास्कर किन्नाके, माजी पंस सभापती कुंदाताई जेणेकर, माजी जिप सदस्य अविनाश जाधव, बापूजी धोटे, अजय रेड्डी, भास्कर शेडाम, राजकुमार ठाकुर, अरुण सोमलकर, सरिताताई रेड्डी, प्रशांत पवार, प्रीतीताई पवार, अजित टाक, अविनाश रामटेके, प्रवीण चिडे, बबन टाकसांडे आणि मोठ्या संख्येने परिसरातील महिला व पुरुष उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख मागण्या:
- वरुर, विरूर, धानोरा, कवीठपेठ, चिंचोली, अंतरंगाव (अन्नूर) या मार्गाला राज्य महामार्ग घोषित करणे.
- रस्त्याचे त्वरित रुंदीकरण व डांबरीकरण करणे.
- अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करणे.
- आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देणे.
हा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.