Stock of flavored tobacco seized
राजुरा येथे सुगंधित तंबाखूचा साठा जप्त
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 07 मार्च 2025) -
राजुरा पोलीस स्टेशनच्या (police station rajura) पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत सुगंधित तंबाखूचा अवैध साठा जप्त केला आहे. सदर प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, एकूण एक लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गुरुवारी (06 मार्च) पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हाके आणि पोलीस शिपाई तिरुपती जाधव हे खाजगी वाहनाने गस्त घालीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, महाराजा ट्रॅव्हल्स या खाजगी बसने सुगंधित तंबाखू मजा हा माल राजुरा येथे येत आहे. खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीसांनी नाका क्रमांक 03, कृष्णा हॉटेलसमोर सापळा रचला. काही वेळाने महाराजा ट्रॅव्हल्स आली व त्यामधील पार्सल बाहेर काढण्यात आले. तपासणी दरम्यान, पांढऱ्या रंगाच्या नायलॉन पिशवीवर ‘मुस्कान, राजुरा’ असे लिहिलेले पार्सल उघडण्यात आले. त्यामध्ये मजा 108 हुक्का शिषा तंबाखूचे एकूण 80 नग आढळून आले. प्रत्येकी 200 ग्रॅम वजनाच्या या तंबाखूच्या डब्यांची किंमत अंदाजे 1,250 प्रति नग असून, एकूण 1,00,000/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी महादेव काशीनाथ अडवे वय 36, रा. जवाहरनगर राजुरा याला अटक करण्यात आली आहे.
राजुरा पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. 109/2025 अन्वये अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 कलम 30(2)(A), 26(2)(i), 26(2)(iv), 59 तसेच भारतीय दंड संहिता कलम 223, 274, 275, 123 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी IPS अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि पांडुरंग हाके आणि पोलीस शिपाई तिरुपती जाधव यांनी केली. गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल राजुरा पोलीस स्टेशनच्या मुद्देमाल मोहररकडे जमा करण्यात आला असून, पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.
अवैध धंद्यांना आळा बसणार – IPS अनिकेत हिरडे
प्रभारी अधिकारी IPS अनिकेत हिरडे (IPS Aniket Hirde) यांनी राजुरा पोलीस स्टेशनचा चार्ज स्वीकारल्यानंतर तालुक्यातील अवैध व्यवसायांवर मोठी गळती सुरू केली आहे. अवैध रेती व कोळसा तस्करी, वेकोलीतून डिझेल चोरी, भंगार व्यवसाय, सुगंधित तंबाखू, गोवंश तस्करी, अवैध दारू विक्री, जुगार-सट्टा आणि झेंडा मुंडी यासारख्या अवैध धंद्यांचे धाबे दणाणले आहेत. IPS अनिकेत हिरडे यांनी ठाम भूमिका घेत तालुक्यातील सर्व अवैध धंद्यांना आळा घालण्यावर भर दिला आहे. यामुळे पूर्वी भरभराटीस आलेले अवैध व्यवसाय मंदावल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.