construction worker
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
भद्रावती: (दि. २० मार्च २०२५) -
महाराष्ट्र शासनाकडून नोंदणी केलेल्या बांधकाम मजुरांना आवश्यक सुरक्षा व बांधकाम साहित्य तालुका स्तरावरच वितरित करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख सौ. मिनलताई आत्राम यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांना दिला. या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
सध्या महाराष्ट्र शासनातर्फे नोंदणीकृत मजुरांना आवश्यक सुरक्षा व बांधकाम साहित्य वितरित करण्याची योजना आहे. मात्र, हे साहित्य केवळ एमआयडीसीतूनच वाटप केले जात असल्याने मजुरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, ऑनलाईन पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून साहित्य वितरण ठप्प झाले आहे. अधिकारी वेळोवेळी नवी तारीख जाहीर करतात, मात्र प्रत्यक्षात मजुरांना साहित्य मिळत नाही. त्यामुळे अनेक मजूर दोन-दोन दिवस एमआयडीसीमध्ये राहूनही रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.
याठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, शिवाय अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे मजुरांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील मजूर साहित्य मिळवण्यासाठी एमआयडीसीत जमत असले तरी, योग्य वितरण होत नसल्याने त्यांना मोठ्या निराशेला सामोरे जावे लागत आहे. यामुळे त्यांचा रोजगारही बाधित होत आहे.
तालुका स्तरावरच बांधकाम साहित्य वाटप केल्यास मजुरांना गावातूनच साहित्य सहज उपलब्ध होईल आणि अनावश्यक त्रास टाळता येईल. त्यामुळे तातडीने ही मागणी पूर्ण करावी, अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सौ. मिनलताई आत्राम यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांना दिला आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडेही निवेदन सादर करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.