चंद्रपूर येथील जलतरणपटूंमध्ये आनंदाचे वातावरण
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि.१८ मे २०२४) -
पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पायाभूत सुविधा, क्रीडा, सांस्कृतिक आदी क्षेत्रांच्या विकासासह चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला आहे. प्रत्येक क्षेत्रात विकासाचा माईल स्टोन गाठत असतानाच क्रीडा क्षेत्रात आणखी एक टप्पा ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे पूर्ण झाला आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले जलतरण केंद्राचे अद्ययावतीकरण पूर्ण झाले असून शहरातील जलतरणपटूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथील जलतरण तलाव नूतनीकरणाकरिता पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजन समिती चंद्रपूर कडून २०२२-२०२३ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून एक कोटी ५७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून जलतरण तलावातील वॉटरप्रूफिंग, टाइल्स फिल्टरेशन प्लांट, प्रसाधनगृहांच्या दुरुस्तीच्या कामांसह विद्युतीकरण तसेच प्रकाश झोताची व्यवस्था, प्रेक्षक गॅलरी, रेलिंग टेक एरियाची दुरुस्ती इत्यादी कामे हाती घेण्यात आली होती. आता ही कामे पूर्ण झाली असून शहरातील जलतरणपटूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याठिकाणी नियमित सरावासह उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे देखील आयोजन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे दररोज चारशे खेळाडू याठिकाणी प्रशिक्षणाचा लाभ घेत असून नियमित सराव करणाऱ्या जलतरणपटूंची गर्दी देखील वाढली आहे.
पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकीक प्राप्त करण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम व योजना राबविल्या. विशेषत्वाने क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सोयीसुविधांवर त्यांनी लक्ष दिले. यामध्ये जिल्हा क्रीडा संकुलाची दुरुस्ती व नुतनीकरण तसेच चंद्रपूरातील कोहीनुर स्टेडियमचे नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. यासोबतच ज्युबिली हायस्कुल परिसरात १५ कोटी रुपये किमतीच्या हुतात्मा बाबुराव पुलेश्वर शेडमाके स्मृती स्टेडियमच्या बांधकामाला मंजुरी देणे, बाबुपेठ परिसरात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमची निर्मिती करणे, बल्लारपूर शहराच्या शेजारी अत्याधुनिक स्टेडियमची निर्मिती करणे आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलासाठी ३ कोटी ३८ लाख ४२ हजार रुपयांच्या निधीला देखील ना. मुनगंटीवार यांच्यामुळे मंजुरी मिळाली.
क्रीडा क्षेत्राचा चौफेर विकास
राज्यात तीन स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक आहेत आणि तिन्ही ट्रॅक चंद्रपूर येथील क्रीडा संकुलात, विसापूर क्रीडा संकूल आणि सैनिक स्कूलमध्ये आहेत. याशिवाय पोलिसांचे सर्वोत्तम जीम चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, पोंभुर्णा आदी ठिकाणी उत्तम स्टेडीयम उभारण्यात येत आहेत. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून ना. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील खेळाडूंना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते, हे विशेष.
#aamchavidarbha #vidarbha #maharashtra
#news #breakingnews #chandrapur #ballarpur #mul #pombhurna
#sudhirmungantiwar #chandrapurkridasankul #visapurkridasankul
#sportscomplex #sainikschoolchandrapur #Athletesfromchandrapurdistrict
#Nationalschoolfieldsportscompetitions #Swimmingpool #Stadium
#Swimmingpoolrenovation #jubileehighschool
#hutatmababuraopuleshwarshedmake
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.