शेतकर्यांना प्रती क्विंटल एक हजार रुपयांचा फायदा होणार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा (दि. १६ मार्च २०२३) -
शेतकर्यांच्या हरभरा या पिकाला योग्य दर मिळावेत यासाठी हरभरा खरेदी नाफेड तर्फे आणि व्यापको अंतर्गत चांदागड फार्मर प्रोड्युसर कंपनी द्वारे राजुरा (Chandagarh Farmer Producer Company Rajura) येथे सुरू होणार आहे. हरभरा या शेतमालाला प्रती क्विंटल 5335 रुपये एवढा दर मिळणार असून शेतकर्यांनी तातडीने नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन चांदागड कंपनी द्वारे करण्यात आले आहे.
यापुर्वी व्यापारी हरभरा पिकाला रुपये 4300 ते 4550 प्रति क्विंटल दर देत होते. यामुळे शेतकर्यांची मोठी लूट होती. परंतु हमीभावाने नाफेड द्वारे हरभरा खरेदी करण्याचे घोषित केल्यानंतर शेतकर्यांनी 14 मार्च पर्यंत नोंदणी करायची होती. आता ही मुदत वाढवून 31 मार्च 2023 पर्यंत करण्यात आली आहे. हरभरा रब्बी पिकाच्या नोंदणीसाठी सात बारा, शेतकऱ्याचे आधार कार्ड व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रांची गरज आहे. आतापर्यंत सुमारे 400 शेतकर्यांनी हरभरा पिकाची नोंदणी केली असून कंपनीच्या राजुरा बसस्थानक शेजारच्या गोदामात ही खरेदी होणार आहे. आता नाफेड हरभरा खरेदी सुरू करीत असल्याने शेतकर्यांना प्रती क्विंटल एक हजार रुपयांचा फायदा होणार आहे. स्थानिक चांदागढ़ फार्मर प्रोड्युसर कंपनी राजुराचे संचालक लक्ष्मण घुगुल, उमाजी रामटेके, दिनेश पारखी, मधुकर डांगे, सुरेश आस्वले, अनिकेत साळवे, मनीषा रामगिरवार यांनी शेतकर्यांना त्यांच्या हरभरा पिकाचे योग्य दर मिळत असल्याने तातडीने चांदागड कंपनीत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. (Agricultural Produce Market Committee Rajura)
पूर्वी शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात हरभरा या पिकाची उत्पादकता हेक्टरी 7 क्विंटल एवढी आखली होती, मात्र यावर्षी कृषी विभागाने जिल्ह्यातील उत्पादकता हेक्टरी 12.06 क्विंटल एवढी घोषित केली आहे. यामुळे शेतकर्यांचा फायदा होणार आहे. मात्र या शेतमालाची आद्रता 12 टक्के पेक्षा कमी असणे गरजेचे असून हरभरा एफएक्यु दर्जाचा असावा. शेतकर्यांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा.
- कु. मंगला मेश्राम
- सचिव, कृ.उ.बाजार समिती, राजुरा
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.