चंद्रपूर -
चंद्रपूर परिमंडळात डिसेंबर-2021 अखेर कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार ग्राहकांची संख्या 60 हजार 323 एवढी असून त्यांच्याकडे व्याज व विलंब आकार धरून 33 कोटी 31 लाख रुपयांची थकबाकी आहे.
वीज बिलांच्या थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडील वीजपुरवठ्याचा पुनरुज्जीवनासाठी महावितरणने विलासराव देशमुख अभय योजना 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या मुदतवाढीमुळे घरगुती ग्राहकांसोबतच व्यवसाय आणि उद्योगांना पुनरुज्जीवनाची संधी मिळणार आहे.
चंद्रपूर परिमंडळात वीज ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात बिलाची थकित पडली आहे. वारंवार नोटीस देऊनही वीज बिलाचा भरणा झाला नसल्याने अखेरीस महावितरणने ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केला आहे. डिसेंबर2021 अखेरपर्यंत सुमारे 60,232 ग्राहकांकडे व्याज व विलंब आकारसह 33 कोटी 31 लाख रुपये थकित आहे. त्यांना व्याज व विलंब आकाराचे 3 कोटी 24 लाख योजनेत सहभागी झाल्यास माफ होणार आहेत. मुळ थकबाकीच्या 10 टक्के सुट म्हणजे 3 कोटी 33 लाख अधिक अशी 6.5 कोटींची सुट मिळणार आहे. ज्या ग्राहकांचे अर्ज 30 सप्टेबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज मंजूर केले आहेत त्यांनी 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत थकबाकीच्या 30 टक्क्यांचा पहिला हप्ता किंवा संपूर्ण थकबाकी एकरकमी भरावयाची आहे.
चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत, चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, वरोरा, बल्लारशा व ब्रह्मपुरी विभागातील एकूण 30,993 ग्राहकांकडे 19 कोटींची थकबाकी आहे. तर, गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली व आलापल्ली विभागातील एकूण 29,330 ग्राहकांकडे 14 कोटी 22 लाखांची थकबाकी आहे.
डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ
या योजनेनुसार थकबाकीची मुळ रक्कम हफ्तेवारीने अथवा एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णतः माफ़ होईल. योजनेनुसार 31 डिसेंबर रोजी किंवा त्यापूर्वी थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहक या योजनेत पात्र होते. योजनेचा कालावधी सहा महिन्यांसाठी (1मार्च ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत) होता. मात्र, अनेक ग्राहकांनी विलासराव देशमुख अभय योजनेस 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची व वीजबिल थकबाकी भरण्याची तयारी दर्शविल्याने आता या योजनेस डिसेंबर-2922 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
ग्राहकांनी सहभागी व्हा
हफ्तेवारीचा लाभ घेणारा ग्राहक हफ्ता भरण्यास अपयशी ठरल्यास तो ग्राहक या योजनेतून अपात्र ठरेल आणि त्यास कोणतेही लाभ दिले जाणार नाहीत.थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहकांनी अधिकाधिक संख्येने या योजनेत सहभागी व्हावे.
- सुनील देशपांडे, मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.