Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वर्धा नदीला पूर आल्याने राजुरा-बल्लारपूर मार्ग बंद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वर्धा नदीला पूर आल्याने राजुरा-बल्लारपूर मार्ग बंद इरई धरणाचे सर्व ७ दरवाजे १ मीटरने उघडल्याने पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ चंद्रपूर - गे...
वर्धा नदीला पूर आल्याने राजुरा-बल्लारपूर मार्ग बंद
इरई धरणाचे सर्व ७ दरवाजे १ मीटरने उघडल्याने पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ
चंद्रपूर -
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्याने इरई धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत तर लोअर वर्धाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. याशिवाय गोसेखूर्दचे २८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. पावसाची संततधार सुरू असल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे. यामध्ये वर्धा, वैनगंगा, इरई नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे राजुरा-बल्लारपूर मार्ग आज सकाळी ११ वाजताच्या दरम्यान बंद झाला आहे. पूलावर पाणी वाहू लागल्याने या पुलावरून वाहतूक थांबविण्यात आली आहे. मात्र सध्या सास्ती मार्गे वाहतूक सुरु असली तरी पाण्याची वाढती पातळी बघता हाही मार्ग धोपटाला जवळील नाल्या जवळ बंद होऊ शकतो. 
जिल्ह्यातील सर्वात मोठे इरई धरणाचे संपूर्ण सात दरवाजे १.० मीटर ने उघडल्याने एकूण ५१७ क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होणार आहे. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगावावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास आपत्ती व्यवस्थपणाने जरी केलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

जिल्ह्यात पूर परिस्थिती
सोईट गावातील वर्धा नदीपात्राची पाण्याची पातळी वाढल्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहे. आज सकाळ पासून वाहतूक बंद झाली आहे. तर गोंडपिपरी तालुक्यातील तोहगाव ते लाठी दरम्यान वेजगांव नाल्याला आलेल्या पुरामुळे मार्ग बंद आहे. बल्लारपूर तालुक्यातील माना ते चारवट हडस्ती मार्ग ईरइ नदीला आलेल्या पुरामुळे आज सकाळ पासून बंद झाला आहे.
चंद्रपूर शहरातल्या रहमतनगर या सखल भागात इरई नदीचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. जवळपास ६० ते ७० घरात नदीचे पाणी शिरले आहे. इरई धरणाचे सर्व ७ दरवाजे १ मीटरने उघडल्याने इरई नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. पाणी सातत्याने वाढत राहिल्यास चंद्रपूर शहरातल्या आणखी काही भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे.
इरई धरणाच्या संचय क्षेत्रात चिमूर-चारगाव बंधारा भागात मुसळधार पावसाने धरणात पाणी वाढत आहे. इरई नदीच्या पात्रालागत वास्तव्याला असलेल्या नागरिक व शेतकऱ्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. धरणातून ४९० क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होतोय. तेलंगणा राज्याला जोडणारा राजुरा शहराजवळचा वर्धा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच असून गोसेखुर्द धरणाचा विसर्ग वाढल्यास जिल्ह्यात ब्रम्हपुरी भागात देखील पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top