आमचा विदर्भ ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
आरोग्य विभाग, सिकलसेल व थॅलेसेमिया सोसायटी चंद्रपूर व राजुरा तालुका मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० जून २०२२ सोमवार ला देवाडा प्राथमिक स्वास्थ केंद्रात सकाळी ९ वाजता पासून मोफत भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा, असे आवाहन सिकलसेल सोसायटी, आरोग्य विभाग व मंडळाकडून करण्यात आले आहे.
शिबिराचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे करणार असून अध्यक्षस्थानी राजुरा उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. लहू कुळमेथे राहणार आहेत. शिबिरात बालरोग तज्ञ डॉ. संदीप बांबोळे, सिकलसेल सोसायटीतर्फे आयसीएमआर च्या डॉ. कल्पिता गावित, स्त्री रोगतज्ञ डॉ. प्रणाली लांजेवार, वैद्यकिय अधिकारी डॉ. बिपिनकुमार ओदेला इत्यादी वैद्यकिय अधिकारी या शिबिरात सहभागी होणार आहेत.
उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत असतांना ग्रामीण भागात विविध आजार बळावत असतात. या काळात आरोग्य विषयक विविध समस्या निर्माण होतात. शिवाय राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने याविषयी ग्रामीण भागातील नागरीकांना जागृत करून आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जोपासत सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात सिकलसेल व थॅलेसेमिया तपासणी आणि महिला तसेच लहान मुले यांची आरोग्य तपासणी मोफत केली जाणार आहे. यात रक्ताच्या विविध तपासण्या मोफत होणार आहेत. शिबीरात बालरोग तज्ञ व महिला रोग तज्ञ आपली सेवा देणार असून औषधी वाटप होणार आहे. तरी ग्रामीण नागरिकांनी या मोफत शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.