Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जातपात न पाहता आदिवासींच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या सच्चा कार्यकर्त्याच्या पाठीशी समाजाने उभे राहावे - प्रभु राजगडकर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जातपात न पाहता आदिवासींच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या सच्चा कार्यकर्त्याच्या पाठीशी समाजाने उभे राहावे - प्रभु राजगडकर तिसरी कोलाम परिषद थाट...

  • जातपात न पाहता आदिवासींच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या सच्चा कार्यकर्त्याच्या पाठीशी समाजाने उभे राहावे - प्रभु राजगडकर
  • तिसरी कोलाम परिषद थाटात संपन्न
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
आदिवासींचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी एक विचारसरणी सातत्याने प्रयत्न करते आहे. समाजातील नेतृत्वाने या शक्तीविरूध्द उभे राहीले पाहिजे. समाजाला सक्षम करण्यासाठी झटणाऱ्या व आदिवासींच्या हक्कासाठी लढा उभारणा-या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी समाजाने जातपात न बघता भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. असे मत व्यक्त करून प्रभू राजगडकर यांनी कोलाम विकास फाऊंडेशनने कोलामांच्या सशक्तीकरणासाठी उभारलेल्या लढ्याची प्रशंसा केली. कोलाम विकास फाऊंडेशन व अन्य सोळा सहयोगी संस्थांनी संयुक्तपणे सोमवार (ता.२) ला कोलाम परिषद आयोजित केली. या कोलाम परिषदेचे उद्घाटन प्रभू राजगडकर यांचे हस्ते करण्यात आले. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार अॅड वामनराव चटप म्हणाले की, शासनाने आदिवासींच्या हक्काचा निधी पळविला. एकाही आदिवासी आमदाराने सरकारला जाब विचारला नाही. आदिवासी पाड्यातील प्रश्न अधिक गंभीर बनत चालले आहे. अशावेळी कोलाम परिषदेच्या माध्यमातून कोलामांमध्ये सशक्त नेतृत्व उभे राहीले पाहिजे म्हणून कोलाम विकास फाऊंडेशन सारख्या संस्था प्रयत्न करते आहे. हे अतिशय प्रशंसनीय आहे. कालपर्यंत अन्य सामाजिक घटकांपासून लांब राहणारा समाज आज व्यासपिठावर आणि व्यासपीठाच्या समोर एकवटतोय,हे चित्र अतिशय बोलके व आशादायी आहे. 
यावेळी व्यासपीठावर कोलाम परिषदेचे स्वागताध्यक्ष अविनाश जाधव, चंदू पाटील मारकवार, अविनाश पोईनकर, अॅड बोधी रामटेके, पत्रकार प्रमोद काळबांडे, माजी प्राचार्य दौलतराव भोंगळे, माजी जि. प. सभापती निळकंठराव कोरांगे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, जेसिआयचे सुषमा शुक्ला, कोलाम विकास फाऊंडेशनचे उपाध्यक्ष पुजू कोडापे, सचिव मारोती सिडाम, नानाजी मडावी, जैतू कोडापे आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी जेष्ट सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, माडिया जमातीचे पहिले वकील म्हणून अॅड लालसू नोगोटी, अभियंता आर. पी. गेडाम व कोलाम समुदायातील कर्तबगार व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. तत्पुर्वी शहरात कोलाम दिंडीच्या माध्यमातून कोलामांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी केले. संचालन किशोर कवठे यांनी तर आभार प्रदर्शन बादल बेले यांनी केले. 

राज्यमंत्री ना. बच्चू कडूंनी साधला 'आभासी' संवाद
अतिव्यस्ततेमुळे कोलाम परिषदेला उपस्थित राहता न आल्याने शालेय शिक्षण राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांनी आभासी पध्दतीने कोलामांशी संवाद साधून लवकरच कोलामांच्या भेटीला येण्याचे आश्वासन दिले. कोलामांच्या प्रश्नांवर सरकारला प्रभावी उपाययोजना करण्यास भाग पाडू असेही त्यांनी सांगितले. 

परिषदेने प्रभावी विचारांची पेरणी केली
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा म्हणाले, गावाचा विकास हाच देशाचा विकास आहे. म्हणून ग्रामसभा बळकटीकरण करून प्रत्येक गाव समृद्ध करण्यासाठी आपले प्रयत्न असले पाहिजे. गावांनी आपल्या विकासाच्या योजना स्वत: तयार करून त्या अंमलात आणाव्यात. 

चंदू पाटील मारकवार म्हणाले, प्रत्येकांनी आपल्यातील सुप्त शक्ती ओळखून, त्या जागृत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावातील प्रत्येक व्यक्ती ग्रामसभेचा सदस्य आहे आणि ग्रामसभा ही सर्वोच्च आहे, हे प्रत्येकांनी समजून घेण्याची गरज आहे. 

अॅड बोधी रामटेके म्हणाले की, बाबासाहेबांनी घटनेत समान हक्क व न्यायाची बाब अधोरेखित केली आहे.मात्र आपल्याला जाणिव नसल्याने आपले हक्क हिरावून घेतले जात आहे.

लालसू नोगोटी म्हणाले, आपला लढा हा व्यवस्थेविरुद्ध आहे. ही व्यवस्था आदिवासींचे हक्क, अधिकार हिरावून घेऊन आदिवासींच्या अस्तित्वावरच हल्ला करण्यासाठी टपलेली आहे. 

पत्रकार अविनाश पोईनकर म्हणाले, आम्ही आता शहाणे होण्याची गरज आहे. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांनी सांगितलेल्या मंत्रा नुसार कृती करण्याची आज गरज आहे. 

परिसंवादाचे अध्यक्ष पत्रकार प्रमोद काळबांडे म्हणाले, परिस्थितीनुसार आपण बदल स्विकारणे गरजेचे आहे. मुलभूत सोयी सुविधांचा लढा लढत असताना आपण आपल्या पुढच्या पिढीला शहाणे करण्याचा लढा ही लढला पाहिजे. 

बेधुंद होऊन संस्कृतीचे दर्शन घडविले कोलामांनी
या परिषदेच्या अखेरच्या सत्रात कोलामांसाठी पारंपरिक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला कोलाम युवक युवतीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय मोरे, दिलीप सदावर्ते, रत्नाकर चटप, मधुकर डांगे, अॅड दिपक चटप, अल्का सदावर्ते, सुनीता कुंभारे, सारिका जाधव, लटारू मत्ते, कृतिका सोनटक्के, स्वरूपा झंवर, देवू सिडाम, नामदेव कोडापे, हरिनाक्षी कुंभारे, राधा दोरखंडे, बापूराव आत्राम व अन्य सहका-यांनी परिश्रम घेतले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top