- नांदा प्राथमिक आरोग्य केंद्र पावसाळ्या आधी सुरू करू
- जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची ग्वाही
- रत्नाकर चटप यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा
- माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या खनिज विकास निधीतून ९ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र उदघाटनाच्या प्रतीक्षेत
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, तीन महिने उलटूनही अद्याप प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झालेले नाही. नांदा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रत्नाकर चटप यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना तातडीने आरोग्य केंद्र सुरू करण्याविषयी मुंबई येथे निवेदन दिले. तसेच १७ तारखेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा चटप यांनी प्रशासनाला दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी आज रत्नाकर चटप यांच्या शिष्टमंडळाची भेट व चर्चा झाली. नांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास पावसाळ्याच्या आधी नांदा येथील प्राथमिक सुरू करू अशी मौखिक ग्वाही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लेखी स्वरुपात रत्नाकर चटप यांना पत्र पाठवून लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण होईल; उपोषणास स्थगिती द्यावी अशी विनंती दोन दिवसांआधी केली होती. त्यानंतर आज जिल्हा परिषदेत बैठक पार पडली.
माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या खनिज विकास निधीतून तब्बल ९ कोटी रुपये खर्च करून संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम करण्यात आले. यासाठी ग्रामपंचायतीने तीन एकर जागा दिल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लागला. गेल्या तीन वर्षांपासून ताटकळत असलेले बांधकाम अखेर पूर्ण झाले. संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शासनाने १५ पदांची मंजुरीही दिली. परंतु उद्घाटनाचा मुहूर्त मात्र प्रशासनाला मिळालेला नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे लगतच्या बिबी, नोकारी, पालगाव, हिरापूर, आवारपूर, वडगाव, खिर्डी, राजुरगुडा, लालगुडा, पिंपळगाव आदी गावांतील रुग्णांना आरोग्य सेवेचा मोठा लाभ मिळणार आहे.
शासनाने नांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पणाची नेमकी तारीख अथवा महिना सांगितला नाही. त्यामुळे अद्याप उपोषणास स्थगिती देणार नाही. मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी हे योग्य दखल घेऊन पाठपुरावा करीत आहे. या आंदोलनाने शासनस्तरावर गती यावी व नांदा येथील बहुप्रतिक्षित आरोग्य केंद्र सुरू व्हावे हा हेतू असल्याचे मत रत्नाकर चटप यांनी आरोग्य अधिकारी यांच्यासमोर मांडले. जिल्हा सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश साठे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे यांनी सकारात्मक चर्चा केली. यावेळी रत्नाकर चटप यांचेसह शिष्टमंडळात अविनाश पोईनकर, ॲड. दीपक चटप, ॲड. देवा पाचभाई, प्रकाश उपरे आदींची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.