- आई आईच असते
- आईने बिबट्यावर काठीने वार करीत तीन वर्षीय चिमुकलीला वाचविले
- बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय बालिका गंभीर जखमी
- वनविभागाच्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी डांबले
- 5 तासानंतर RFO सहित वन कर्मचाऱ्यांची गावकऱ्यांनी केली सुटका
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर / दुर्गापूर -
दि. 10 मे ला रात्री 9 वाजताच्या दरम्यान दुर्गापुरातील वार्ड क्रमांक 1 मध्ये 3 वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला, मात्र मुलीच्या आईने बिबट्यावर काठीने प्रहार करीत आपल्या मुलीचा जीव वाचविला. मागील अनेक महिन्यापासून तो नरभक्षक बिबट्या दुर्गापुरातील लहान व मोठ्यांची शिकार करीत आहे. मात्र वनविभागाने अजूनही त्या बिबट्याचा बंदोबस्त केला नाही. मध्यंतरी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते मात्र तो नरभक्षक बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात सापडलाच नव्हता. त्यामुळे त्या नरभक्षकाचे हल्ले सतत सुरुच होते. 10 मे ला रात्री 9 वाजता आरक्षा पोप्पूलवार ही 3 वर्षीय चिमुकली खेळून झाल्यावर जेवायला बसली होती. त्याचवेळी अचानक बिबट्याने आरक्षावर हल्ला केला. मुलीवर हल्ला होताच आईने त्या बिबट्यावर काठीने वार करीत बिबट्याच्या तावडीतून मुलीला सोडविले. दुर्गापूर पोलिसांनी तात्काळ त्या मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने मुलीची प्रकृती आता बरी आहे.
वन्यजीवांच्या मानवी वस्त्यांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे दुर्गापुरातील नागरिक चांगलेच संतापले असून वनविभागाचे RFO राहुल कारेकर व त्यांची चमू रात्री दुर्गापुरात पोहचली होती मात्र त्यावेळी त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संतापलेल्या गावकऱ्यांनी RFO सहित वनविभागाच्या 10 कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले. जोपर्यंत त्या नरभक्षकाला ठार मारण्याचे आदेश वनविभाग देणार नाही तोपर्यंत आम्ही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोडणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. तब्बल पाच तासांच्या नाट्यक्रमानंतर वनविभागाच्या वतीने त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वनविभागाने जारी केले. त्यामुळे गावकऱ्यांनी RFO कारेकर सहित असलेल्या 10 कर्मचाऱ्यांची सुटका केली. असे सूत्रांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.