- वेगळे विदर्भ राज्याच्या मागणीसाठी "विदर्भ जनजागरण यात्रा" आजपासून सुरु
- विदर्भवादी कार्यकर्ते सहकाऱ्यांसह विदर्भाचा दौरा करून करणार जनजागृती
- बघा व्हिडीओ काय म्हणाले विदर्भवादी कार्यकर्ते
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणी विषयी जनजागरण करण्यासाठी सामाजिक व ज्येष्ठ विदर्भवादी कार्यकर्ते मिलिंद गड्डमवार, रोशन येवले व स्वप्नील कोहपरे हयांनी आपल्या सहकाऱ्यांसह विदर्भाचा दौरा सुरू केला आहे. आज दिनांक 16 एप्रिल ला श्री हनुमान जन्मोत्सवाच्या पावन दिवसावर दुपारी एक वाजता महात्मा गांधी, महात्मा फुले आणि संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण करीत त्यांच्या विदर्भ दौऱ्याचा शुभारंभ झाला.
वेगळा विदर्भ, त्यामागील आर्थिक वस्तुस्थिती, आर्थिक मागासलेपण, कुपोषण, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, सिंचन, विकासकामांचा अनुशेष या सर्व समस्या आणि ते सोडविण्यासाठी होणारा अपुरा प्रयत्न यामुळे आता महाराष्ट्रात राहणे विदर्भाला मुळीच उपयोगी नाही. विदर्भ महाराष्ट्रात सामील झाल्यापासून येथील लुटीचा एक इतिहासच निर्माण झाला आहे. आता राज्यावर एवढे कर्ज झाले आहे की राज्यकर्ते कधीही विदर्भाला न्याय देऊ शकत नाही. विदर्भात सर्व कच्चा माल, खनिज संपत्ती, वनसंपत्ती, चांगली जमीन, भरपूर पाणी आणि पिके येत असताना सर्व कारखाने मात्र पश्चिम महाराष्ट्रात आहेत. मुंबई - पुणे - नाशिक असा औद्योगिक कॉरिडॉर जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आला. पुणे या एकट्या जिल्ह्यात उद्योग व शेती यासाठी प्रचंड विजेचा पुरवठा आपला चंद्रपूर जिल्हा करीत असताना दुसरीकडे प्रदूषण, धूळ, अपघात, उष्णतामान भारनियमन यांचे चटके सोसत आहे. विदर्भातील सर्व राजकिय नेत्यांकडून जनता नेहमी याबाबत मोठी अपेक्षा ठेवते पण आपला हेतू साध्य झाला की हे नेते आपण त्या गावचेच नाहीत, अशी भूमिका घेतात, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. यामुळे या सर्व बाबी तरुण, विदयार्थी, सामान्य नागरिक, व्यावसायिक, शेतकरी या सर्वांपुढे मांडण्यासाठी विदर्भाचा दौरा आयोजित केल्याचे मिलिंद गड्डमवार यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन मोठ्या स्वरूपात होण्यासाठी विदर्भातील नागरिक आणि विशेषतः युवकांना हा मुद्दा अधिक प्रकर्षाने समजावून द्यायची गरज आहे. म्हणुन आपण तरुणांना सोबत घेऊन एक सार्थ विचार घेऊन आपण विदर्भ यात्रा करीत असल्याचे मिलिंद गड्डमवार यांनी सांगितले.
ही यात्रा विदर्भाच्या सर्व अकराही जिल्ह्यात जाणार असून तिथे नागरिकांसोबत विचारमंथन करणार आहे. या विदर्भ संवाद यात्रेला नागरिकांनी साथ द्यावी, असे आवाहन मिलिंद गड्डमवार, रोशन येवले व स्वप्नील कोहपरे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.