- भेंडाळा प्रकल्प ; पुनर्वसनातील प्लॉट वाटपाला गावकऱ्यांचा विरोध
- श्रमिक एल्गारच्या तहसील कार्यालवार मोर्चा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा तालुक्यातील भेंडाळा मध्यम प्रकल्पाअंतर्गत बेरडी, जुनी बेरडी या गावांचे बामनवाडा येथे पुनर्वसन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. जिथे पुर्नवसन करण्यात येत आहे. तिथे कुठल्याच नागरी मूलभूत सुविधा नाही. जुनी बेरडी येथील प्रकल्पग्रस्त आदिवासी बांधवांना ईश्वरचिट्ठीने प्लॉट वाटप करण्याकरिता नोटीस देण्यात आल्या. मात्र पुनर्वसना ठिकाणी कोणत्याही मूलभूत सुविधा नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी प्लॉट घेण्यास तीव्र विरोध दर्शविला. अगोदर मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करा नंतरच प्लॉट वाटप करा अशी ठोक भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली.
मूलभूत सुविधा पुरविण्याच्या मागणीला घेऊन शेकडो प्रकल्पग्रस्तांनी एसडीओ कार्यालयावर धडक दिली.
मागील अनेक वर्षांपासून भेंडाळा मध्यम प्रकल्पात बेरडी, जुनी बेरडी ही गावे गेली. या गावांचे बामनवाडा येथे पुर्नवसन करण्यात येणार होते. त्यासाठी २०२० पर्यंतचा कालावधी मागविण्यात आला. या गावात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची हमी सरकारने घेतली होती. मात्र, अजूनही या गावात वीज, पाणी, रस्ता या मूलभूत सुविधा नाही. असे असतानाच जुनी बेरडी येथील प्रकल्पग्रस्तांना ईश्वरचिठ्ठीने प्लॉट वाटप करण्याबाबत नोटीस देण्यात आल्या. सुविधाच नाही, तर जागा घेऊन करायचे काय, असा प्रश्न प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सोमवारी प्रकल्पग्रस्तांनी तहसील कार्यालयावर धडक दिली.
- पुनर्वसनाच्या ठिकाणी जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे,
- अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रिटचे करावे,
- विजेची व्यवस्था करावी,
- पिण्याच्या पाण्याची सोय करावी,
- पुनर्वसन जागेला संरक्षण भिंत बांधावी,
- शाळेच्या इमारतीत दिव्यांची सोय करावी,
- समाजमंदिरात वीज,
- पाण्याची व्यवस्था करावी
यासह अन्य मागण्यांना घेऊन मोर्चा काढण्यात आला. श्रमिक एल्गारचे अध्यक्ष तुळशीराम किन्नाके, प्रवीण चिचघरे, उपाध्यक्ष घनश्याम मेश्राम, अँड. कल्याण कुमार, सुनील गेडाम, गंगाधर आदे, रवींद्र आदे, मंदा किन्नाके, संजय टेकाम यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन प्रभारी उपविभागीय अधिकारी हरीश गाडे यांना देण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.