Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ज्युबिलीच्या मैदानावर 'झुंड'ची प्रचिती; सीईओंचीही साथ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ज्युबिलीच्या मैदानावर 'झुंड'ची प्रचिती; सीईओंचीही साथ कचऱ्याने वेढलेले मैदान खेळाडूंसाठी होणार सुसज्ज डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्...
  • ज्युबिलीच्या मैदानावर 'झुंड'ची प्रचिती; सीईओंचीही साथ
  • कचऱ्याने वेढलेले मैदान खेळाडूंसाठी होणार सुसज्ज
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
जिल्हास्थान असलेल्या चंद्रपुरात अनेक तालुक्यातून युवक पोलीस, सैनिक भरती व इतर परीक्षांच्या तयारीसाठी दरवर्षी येतात. शहरातीलही अनेक युवक तयारी करतात. मात्र, कोरोनाकाळात व त्यानंतर शहरातील बहुतांश क्रीडांगणांवर सरावाची परवानगी मिळाली नसल्याने शेकडो युवकांना रस्त्यावर धावावे लागत होते. परंतु, जनविकास सेनेच्या पुढाकाराने कचऱ्याने वेढलेले ज्युबिली शाळेचे मैदान आता खेळाडूंसाठी काही महिन्यातच सुसज्ज होणार आहे. या सामाजिक उपक्रमाला  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांचीही साथ मिळाली असून, श्रमदान आणि जिल्हा परिषदेच्या निधीतून काही दिवसातच झुंड सिनेमाची प्रचिती सर्वांनाच अनुभवायला मिळणार आहे.
चंद्रपुरात सध्या सामान्य युवकांसाठी एकही क्रिडांगण उपलब्ध नाही. जिल्हा क्रीडा संकुलनाचे नुतनीकरण सुरू आहे. पोलीस मैदान व इतर ठिकाणी खेळाडूंना सरावाची परवानगी मिळत नाही. त्यामुळे रस्त्यावर धावण्याचा सराव केल्याने खेळाडूंना त्रास होतो. राष्ट्रीय व राज्यस्तरावर नेतृत्व केलेल्या खेळाडूंनाही क्रीडांगणाच्या समस्येचा सामना करावा लागत होता. जिल्ह्यातील अनुभवी क्रीडा प्रशिक्षक असलेले खेळाडू निखिल पोटदुखे, अक्रम शेख, साहिल चहारे, नरेंद्र चंदेल, रोशन बुजाडे, सुशील पेंदोर, निलेश बोळे, अमोल ठाकरे, रामकृष्ण झाडे यांनी
ही बाब जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक पप्पु देशमुख यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांच्या टिमने शहरातील काही क्रिडागंणांची पाहणी करून ऐतिहासिक ज्युबिली शाळेच्या क्रीडांगणाची निवड केली. मात्र, अर्ध्यापेक्षा अधिक मैदान कचरा आणि झाडाझुडपांनी वेढलेले होते. ही स्थिती पाहून काही प्रशिक्षक आणि युवकांच्या साथीने दर रविवारी श्रमदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही आठवड्यांपासून नित्त्याने शंभर ते दीडशे युवक दर रविवारी श्रमदान करीत असून, आता या क्रीडांगणाचे रूपडे पालटले आहे.
या मैदानावर दररोज सकाळी फिरण्यासाठी येणारे पत्रकर मंगेश खाटीक यांनी ज्युबिलीच्या क्रिडांगणाबाबतची ही स्थिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांना प्रत्यक्ष भेटून सांगितल्यानंतर त्यांनीही या उपक्रमाला साथ देण्याचा निर्णय घेतला. स्वत: सीईओ आणि जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांनी गुरुवारी या क्रीडांगणावर भेट देवून श्रमदानही केले. या परिसरात असलेल्या स्पर्धा परीक्षा भवनाची व क्रिडांगणाची पाहणी करून काही महिन्यातच सुसज्ज असे क्रीडांगण तयार करून देण्याचा विश्वास सीईओंनी खेळाडूंना दिला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, कपिल कलोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, कल्पना चव्हाण, पशुधन विकास अधिकारी डॉ. उमेश हिरूडकर, कार्यकारी अभियंता बांगडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. आता श्रमदान आणि जिल्हा परिषदेच्या निधीची जोड मिळणार असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेले भव्य क्रिडांगण आता खेड्यापाड्यातून आलेल्या व शहरातील युवकांसाठी भविष्याचे आशास्थान होणार आहे. कदाचित याच मैदानावरील सरावातून एखादा खेळाडू उद्या देशाचे नाव जगात उज्वल करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

चंद्रपुरात शेकडो युवक पोलीस व सैनिक भरतीचा सराव करून शिक्षण घेत आहे. मात्र, त्यांना सरावासाठी क्रिडांगण नसल्याची बाब समोर आल्यानंतर आपण पुढाकार घेतला. काही क्रिडांगणाची पाहणी केल्यानंतर ज्युबिली शाळेचे प्रशस्त मैदान दृष्टिपथास पडले. परंतु, कचऱ्याने वेढलेले मैदान असल्याने खेळाडंूच्या मदतीने दर रविवारी श्रमदान करण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्यांपासून श्रमदान केले जात असून, या उपक्रमाला आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांचीही भरीव साथ मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात शेकडो खेळाडंूच्या उज्वल भविष्याचे हे क्रिडांगण आशास्थान होणार आहे.
- पप्पु देशमुख
नगरसेवक तथा संस्थापक अध्यक्ष, जनविकास सेना

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top