- जन्म भुमीचे ऋण फेडण्यासाठी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी गुणवंत विद्यार्थी पुरस्कार समारंभ
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
नौकरी निमित्ताने शहरात स्थायिक झालो असलो तरी ज्या गावात जन्मलो, त्या मातीत खेळलो, लहान वयाचा मोठा झालो, थोरांच्या संस्कारात वाढलो म्हणूनच मला यशाचे शिखर गाठता आले. ज्या शाळेने-गावाने मला शिक्षणाचा सुगंध दिला त्या गावाचे ऋण फेडण्यासाठी व येणाऱ्या नव्या पिढीला या मातीशी असलेल्या माझ्या ऋणानुबंधाची आठवण व्हावी यासाठी च मी दरवर्षी गुणवंत विद्यार्थी पुरस्कार समारंभ आयोजित करीत आहे असे गौरवोद्गार पिंपळगावचे सुपुत्र व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे यांनी जिप उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळ्यात केले.
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून १४ एप्रिल रोजी ओंकार नवचैतन्य शिक्षण मंडळ पिंपळगावचे वतीने २०१९ ते २०२२ या शैक्षणिक वर्षांतील वर्ग ८वी मधील नऊ गुणवंत विद्यार्थ्यांचा शिल्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक, शैक्षणिक पॅड, पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे कोरोना काळात ही शाळा बंद न ठेवता विद्यार्जन करणाऱ्या कोरोना योध्दा शिक्षकांचा शाल, बाबासाहेब आंबेडकर यांचे चरीत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बंडू बोढाले होते. प्रमुख अतिथी गोंडवाना शिक्षण संस्थेचे सचिव बापुराव मडावी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपुर कार्यवाह श्रीहरी शेंडे तनिष्का गटनेत्या सौ.लताताई ठाकरे गावातील प्रतिष्ठित नागरिक राजकुमार पानघाटे, घुलाराम वरारकर, विठ्ठलराव जोगी, नाना पाटील ठाकरे, खुशालराव गोहोकार, गणेश विधाते, मुख्याध्यापक अशोक गोरे व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
उदघाटक केशवराव ठाकरे, प्रमुख अतिथी बापुराव मडावी, श्रीहरी शेंडे, विठ्ठलराव जोगी यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले तर शाळेच्या विद्यार्थ्यांनी मनोगतातून डॉ. बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शाळेचे शिक्षकवृंद जी.बी. पाचभाई, कु.एम.के. उरकुडे, एन.एन.मडावी, कु.सी.डी. कोडमेलवार, कु.आर.एस. झाडे, सौ.चटप यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक गोरे, संचालन शाळेचे विद्यार्थी कु.हर्षदा बोबडे व नयन केळझरकर यांनी तर आभार कु. श्रृतीका बोढाले यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.