- जाणून घ्या निसर्गोपचार ! निरामय जीवशैलीचे प्रतीक
- रोगमुक्तीसाठी निसर्गोपचार
- जाणून घेऊया निसर्गोपचार अभ्यासक डॉ. संगीता राजेश शर्मा यांच्याकडून उपचार पद्धतीची तत्त्वे
नांदेड येथील ह्यूम निसर्गोपचार व योग्य केंद्र येथे निसर्गोपचार (Naturopathy) केंद्र सुरू झाले आहेत. ह्यूम निसर्गोपचार व योग्य केंद्र येथे अनेक उपचार पद्धती विकसित झाल्या आहेत. तर जाणून घेऊया निसर्गोपचार अभ्यासक डॉ. संगीता राजेश शर्मा यांच्याकडून या उपचार पद्धतीची तत्त्वे.
निसर्गोपचार ही प्राचीन काळात हिपोक्रेटीज यांनी निर्माण केलेली आणि सव्वाशे वर्षांपूर्वी जर्मन डॉक्टर विन्सेज प्रीस्नीज यांनी विकसित केलेली कमी खर्चाची निसर्गावर आधारित अशी उपचार पध्दती आहे. डॉ.विन्सेज प्रीस्नीज यांना निसर्गोपचाराचे जनक मानतात. हिपोक्रेटीज आणि डॉ. प्रीस्नीज यांच्या दरम्यानच्या काळात इंग्लंडमधील डॉ. जेम्स आणि डॉ.जॉन यांनी निसर्गोपचाराचा प्रसार केला होता. भारतामध्ये राष्ट्रपिता म.गांधी यांनी स्वतः निसर्गोपचाराने उपचार केले. या उपचार पध्दतीचे गांधीजी समर्थक होते. निसर्गोपचाराच्या प्रसारासाठी गांधीजींनी १९४६ मध्ये पुण्याजवळ ऊरळीकांचन येथे आश्रमाची स्थापना केली होती. अद्यापही तो आश्रम चालू आहे.
जगामध्ये अनेक उपचारपध्दती आहेत. त्या सर्वांच्या तुलनेत कमी खर्चाची, सर्वांना परवडणारी, रूग्णाला रोगमुक्त करून निरोगी जीवन देणारी अशी ही उपचार पध्दती आहे. शरीराला निरोगी व सुंदर ठेवण्याचे हे शास्त्र आहे. पृथ्वी म्हणजे माती, आप म्हणजे पाणी, तसेच सूर्यप्रकाश,आकाश आणि वायू या पाच तत्वांपासून आपले शरीर बनलेले आहे. या पाच तत्वांच्या संतुलनामुळे शरीर निरोगी व क्रियाशील राहते. यांचे संतुलन बिघडले की शरीरात दोष-आजार उत्पन्न होतात. ते दोष दूर करण्यासाठी निसर्गोपचार ही साध्या सोप्या पण उपयोगी उपचारांची पध्दती आहे. प्रकृती-चिकित्सा, प्राकृतिक चिकित्सा, नैसर्गिक चिकित्सा, नेचरक्युअर, नॅचरोपॅथी अशा अनेक नावांनी ही पध्दती ओळखली जाते.
आपल्या शरीरात विजातीय द्रव्य म्हणजे विषद्रव्य तयार होणे-जमा होणे हे आजाराचे मूळ कारण आहे. असे निसर्गोपचारात मानतात. त्यामुळे सभी रोग एक -उनके कारण एकहा निसर्गोपचाराचा सिध्दांत आहे. आपल्या दिनचर्येत, राहणीमानात बदल झाल्यामुळे शरीरात विजातीय द्रव्य म्हणजेच विषद्रव्य तयार होतात. या पध्दतीच्या उपचारांनी शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. निसर्गोपचार म्हणजे शरीराची शुध्दी क्रियाच होय, असे उपचार केल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.
या उपचार पध्दतीत नैसर्गिक पध्दतीने उपचार केले जातात. उदा. मसाज, स्टीम बाथ, एनिमाहिपवाथ, मृत्तीका (माती) स्नान, हॉट अँड कोल्ड पॅक, योग व प्राणायाम, उपवास हे प्रमुख उपचार आहेत. मसाजमध्ये तीळ अथवा मोहरीच्या तेलाने संपूर्ण शरीराची मसाज केल्याने रक्ताभिसरण चांगले होवून जठराग्नी प्रदीप्त होतो. पचनक्रिया चांगली होते. शरीर लवचिक व निरोगी होते.
स्टीमवाथमध्ये येणाऱ्या घामाव्दारे शरीरातील सर्व विषद्रव्ये, घाण बाहेर फेकली जाते. वजन कमी होते. शरीराच्या वेदना कमी होवून ताजेतवाने वाटून उत्साह वाढतो. एनिमा केल्याने गॅसेस, आम्लपित्त, बध्दकोष्ठता दूर होते. बहुसंख्य आजार हे पोटाचे विकार, अपचनामुळे होतात. एनिमा केल्याने त्या विकारांच्या मुळावरच घाव घातला जातो. हिप बाथ केल्याने मूळव्याध बध्दकोष्ठता दूर होते. मुख्य म्हणजे स्त्रियांचे प्रॉब्लेम्स कमी होतात.
मडबाथ म्हणजे मृत्तीका स्नानामध्ये संपर्ण शरीराला माती लावतात. त्यामुळे रक्त शुध्द होवून त्वचा निरोगी, चमकदार व सुंदर होते. त्वचेचे आजार कमी होतात. पोटाची व शरीराची उष्णता कमी होते. लघवीच्या इन्फेक्शनवर मड बाथ उपयुक्त आहे. हॉट अँड कोल्ड पॅकमुळे लठ्ठपणा कमी होवून व्यक्ती सडपातळ होते. सांधे दुखीपासून सुटका होते. योग व प्राणायामाचे फायदे तरी सर्वांना माहित आहेत. यामुळे संपूर्ण शरीर निरोगी राहन शारिरीक व मानसिक स्वाथ्य मिळते. सकारात्मक विचार निर्माण होतात. पचन चांगले होते. शरीर लवचिक व सुंदर होते. योग व प्राणायामामुळे चालणे, बोलणे, वागणे यात आमूलाग्र बदल होते. उत्साह व आनंद निर्माण होतो. उपवास केल्याने पचन संस्थेला विश्रांती मिळून शरीरातील विष बाहेर टाकले जाते. निसर्गोपचाराच्या या उपचारांसोबतच आहारविहार, निद्रा याचाही विचार केला पाहिजे. सात्विक भोजन ६/७ तास झोप आणि नियमित व्यायाम या तीन गोष्टींमुळे आपण निरोगी व आनंदी जीवन जगू शकतो.
निसर्गोपचाराचे फायदे -
औषध, रोग आणि व्यसन या तीन गोष्टींपासून मुक्ती मिळते. हा निसर्गोपचाराचा सर्वात मोठा लाभ आहे. निसर्गातील उपयुक्त वस्तूंची माहिती होते. अशी ही सर्वांसाठी उपयुक्त, सर्वांगीण व सोपी उपचार पध्दती आहे. या उपचारांमुळे आजारी व्यक्ती निरोगी होतील आणि निरोगी व्यक्तींना आजार होणार नाहीत. संपूर्ण शरीराचे शुध्दीकरण तर होतेच पण या उपचारांचे कसलेही साईड इफेक्टस होत नाहीत. निसर्गोपचाराने शरीराची चांगल्या पध्दतीने सर्व्हिसिंग होते. अशा रितीने तन-मन आणि जीवन निरोगी व सुंदर करण्याची ही उपचार पध्दती आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.