Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मेडिकल व्यावसायिकाचा दुर्दैवी अंत; बोलेरो पिकअप चालकाचा बेदरकार प्रवास
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अरशद खान यांना धडक दिल्यानंतर दुसऱ्या दुचाकीस्वाराला उडवले; दहेली गावाजवळ ट्रकला धडक आमचा विदर्भ - राजेश अरोरा  बल्लारपूर (दि. २० ऑगस्ट २०२६...
अरशद खान यांना धडक दिल्यानंतर दुसऱ्या दुचाकीस्वाराला उडवले; दहेली गावाजवळ ट्रकला धडक
आमचा विदर्भ - राजेश अरोरा 
बल्लारपूर (दि. २० ऑगस्ट २०२६) -
        बल्लारपूर शहरात मद्यधुंद अवस्थेतील बोलेरो पिकअप चालकाने भरधाव व बेदरकारपणे वाहन चालवत अक्षरशः तांडव घातल्याची धक्कादायक घटना बुधवार, १९ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या बेफाम वाहनचालकाने मेन रोडवरील व्यंकटेश अपार्टमेंटसमोर दुचाकीवरून जाणाऱ्या मेडिकल व्यावसायिकाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अरशद मुबारक खान (वय ४८) यांचा मृत्यू झाला. त्यानंतरही चालकाने वाहन न थांबवता पुढे एका दुचाकीस्वाराला धडक देऊन जखमी केले आणि दहेली गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या अपघातात बोलेरो पिकअप चालकही जखमी झाल्याची माहिती आहे.

मेडिकल व्यावसायिक अरशद खान यांचा मृत्यू
        बल्लारपूर शहरातील टीचर कॉलनी परिसरात राहणारे अरशद मुबारक खान हे ‘बल्लारपूर मेडिकल’ नावाने तीन मेडिकल स्टोअर्स चालवत होते. बुधवार, १९ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ ते ९.३० वाजताच्या दरम्यान ते आपली ओला इलेक्ट्रिक मोपेड क्रमांक MH 34 CG 7786 घेऊन बल्लारपूरहून बामणी येथील आपल्या मेडिकल दुकानाकडे जात होते. दरम्यान, मेन रोडवरील व्यंकटेश अपार्टमेंटसमोर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप क्रमांक MH 32 Q 2595 ने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की अरशद खान हे वाहनावरून दूर फेकले गेले. त्यांच्या डोक्यावरील हेल्मेटही उडून गेले आणि त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली.

प्रत्यक्षदर्शींनी दाखवली तत्परता
        अपघातानंतर परिसरातील प्रत्यक्षदर्शींनी तातडीने जखमी अरशद खान यांना उपचारासाठी वाघमारे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच त्यांचे सुपुत्र मोहसीन खान आणि कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली.

धडकेनंतरही पिकअप चालकाचा बेदरकार प्रवास सुरूच
        अरशद खान यांना धडक दिल्यानंतरही बोलेरो पिकअप चालकाने वाहन थांबविले नाही. मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या चालकाने भरधाव वेगाने वाहन पुढे नेले. यादरम्यान त्याने आणखी एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. यानंतर चालकाने वाहन दहेली गावाच्या दिशेने पळविले. दहेली गावाजवळ त्याच्या बोलेरो पिकअपची समोरून येणाऱ्या ट्रकशी जोरदार धडक झाली. या अपघातात पिकअप चालकही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल
        या प्रकरणी मयत अरशद खान यांचे सुपुत्र मोहसीन अरशद खान (वय २२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलीस ठाण्यात बोलेरो पिकअप क्रमांक MH 32 Q 2595 च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम १०५, १२५ (a), १२५ (b), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि १८५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस करीत आहेत.

एकाच वाहनाने सलग अपघात
        या घटनेमुळे बल्लारपूर शहरात एकाच वाहनाने सलग तीन ठिकाणी अपघात घडवून आणल्याने नागरिकांमध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे, भरधाव वेग आणि बेदरकारपणामुळे एका कुटुंबाने आपला कर्ता सदस्य गमावला असून, अन्य दुचाकीस्वारही जखमी झाला आहे. त्यामुळे अशा प्रकारे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

#Ballarpur #BallarpurNews #Chandrapur #ChandrapurNews #BallarpurAccident #RoadAccident #MaharashtraNews #MaharashtraAccident #ArshadKhan #BreakingNews #CrimeNews #RoadSafety #DrunkDriving #TrafficSafety #BNS #BallarpurPolice #ChandrapurPolice #VidarbhaNews #AmchaVidarbha #MaharashtraBreakingNews

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top