आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारपूर (दि. 19 अगस्त 2026) -
बल्लारपूर बिझनेस असोसिएशनच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी 80 वा स्वातंत्र्यदिन महात्मा गांधी संकुल परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने ध्वजारोहण आणि शुभेच्छा देण्यासोबतच यंदाच्या कार्यक्रमातून व्यापारी व नागरिकांना आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. दरवर्षी एका नवीन व्यापाऱ्याला ध्वजारोहणाचा सन्मान देण्याची असोसिएशनची संकल्पना आहे. त्यानुसार यंदा झेन-झी (Gen-Z) युवा व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे एम.डी. कलेक्शनचे व्यापारी दीपक घरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर असोसिएशनचे अध्यक्ष सादिक जवेरी यांनी उपस्थित व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सांगितले. व्यापारी म्हणून देशाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव ठेवत सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्लास्टिक लॅमिनेटेड पेपर कपच्या वापरावर बहिष्कार
यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्लास्टिक लॅमिनेटेड पेपर कपच्या वापरापासून मुक्त होण्याचा संकल्प. गरम चहा, कॉफी किंवा इतर गरम पेयांसाठी प्लास्टिक लॅमिनेटेड कपचा वापर केल्याने आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांविषयी उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली. असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत भोरे यांनी प्लास्टिक लॅमिनेटेड कपमधून गरम पेय घेताना मायक्रोप्लास्टिक कण शरीरात जाण्याबाबत डॉक्टर व तज्ज्ञांच्या अहवालांमध्ये व्यक्त करण्यात आलेल्या चिंतांची माहिती उपस्थितांना दिली. आरोग्याच्या दृष्टीने अशा कपांचा वापर टाळण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
स्वतःपासून सुरुवात करण्याचा संदेश
प्लास्टिक कपच्या वापरामुळे निर्माण होणारे संभाव्य आरोग्यविषयक धोके टाळण्यासाठी उपस्थित व्यापाऱ्यांनी अशा कपांचा वापर न करण्याचा दृढ संकल्प केला. केवळ आवाहन न करता स्वतःपासून सुरुवात करण्याचा संदेश देत असोसिएशनने ज्येष्ठ तसेच युवा व्यापाऱ्यांना मातीचे ‘कुल्हड’ भेट म्हणून दिले. बल्लू सेठ गिधवानी आणि असोसिएशनचे अध्यक्ष सादिक जवेरी यांच्या हस्ते व्यापाऱ्यांना मातीच्या कुल्हडचे वाटप करण्यात आले. पारंपरिक मातीच्या भांड्यांचा वापर वाढवून प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा तसेच आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा हा उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
व्यापारी वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारी अध्यक्ष प्रदीप भास्करवार, सचिव संजय मुपीडवार, डांगे सर, जगदीश मुंदडा, ज्येष्ठ व्यापारी रामनारायण खंडेलवाल, अमित पाझारे, अरुण वाघमारे, मनोहर चावला, तेजिंदर सिंग दारी, रवींद्र सिंग बवेजा, नरेश मुंदडा, गिरीश गंधेवार, मुरली सेठ मुलांनी, माजिद भाई, दिनेश सोनिग्रा आणि लियाकत अली यांच्यासह बल्लारपूरमधील व्यापारी वर्गाने परिश्रम घेतले. संचालन रवी फुलझाडे यांनी आपल्या प्रभावी शैलीत केले. व्यापारी वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग आणि आरोग्यविषयक जनजागृतीचा संदेश यामुळे बल्लारपूर बिझनेस असोसिएशनचा यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा वेगळा ठरला.
#Ballarpur #BallarpurNews #BallarpurBusinessAssociation #ChandrapurNews #Chandrapur #IndependenceDay2026 #80thIndependenceDay #IndependenceDayCelebration #BallarpurNewsToday #MaharashtraNews #VidarbhaNews #BusinessAssociation #ClayCup #Kulhad #PlasticFreeIndia #PlasticFree #HealthAwareness #EnvironmentAwareness #EcoFriendly #LocalNews #Vidarbha #BallarpurTraders #स्वातंत्र्यदिन #बल्लारपूर #चंद्रपूर #आरोग्यजागरूकता #प्लास्टिकमुक्ती #aamchavidarbha #deepaksharma

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.