आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २१ ऑगस्ट २०२६) –
भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) सुरू आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील 2 लाख 70 हजार 195 मतदारांची नावे मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित, आढळून न आलेले, अन्यत्र नोंदणी किंवा दुबार नोंद अशा कारणांमुळे सध्या ‘अनकलेक्टेबल ई.एफ.’ गटात वर्गीकृत करण्यात आली आहेत. त्यामुळे या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होण्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
मात्र, ही प्रक्रिया अंतिम मतदार यादीपूर्वीची छाननी असून पात्र मतदारांना आपले नाव यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी तसेच चुकीच्या नोंदींबाबत दावे व हरकती दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीची आवर्जून तपासणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
2 लाख 70 हजार 195 मतदार ‘अनकलेक्टेबल’ गटात
विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत जिल्ह्यात एकूण 2 लाख 70 हजार 195 मतदारांची पडताळणी करताना विविध कारणांमुळे त्यांचा सध्याचा पत्ता किंवा पात्रता निश्चित करता आलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये आढळून न आलेले मतदार 28 हजार 581, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार 1 लाख 62 हजार 853, मयत मतदार 51 हजार 913, अन्यत्र नोंदणी केलेले अथवा दुबार नोंद असलेले 25 हजार 598 आणि इतर कारणांतील 1 हजार 250 मतदारांचा समावेश आहे. या मतदारांच्या तात्पुरत्या याद्या 12 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. संबंधित नोंदींबाबत राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी (BLA) माहिती दिल्यास, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत संबंधित माहितीची पडताळणी करून आवश्यक गणना प्रपत्र भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
84.97 टक्के मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण
जिल्ह्यात 30 जून ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत 2 हजार 76 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन मतदारांची माहिती तपासण्याची मोहीम राबविण्यात आली. या प्रक्रियेत गणना प्रपत्र भरून घेऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 17 लाख 97 हजार 655 मतदार नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 15 लाख 27 हजार 460 मतदारांची गणना प्रपत्राद्वारे पडताळणी पूर्ण झाली असून, ही संख्या एकूण मतदारांच्या 84.97 टक्के आहे.
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण; 3 नवीन केंद्रे, 13 केंद्रांचे विलीनीकरण
मतदारांच्या सोयीच्या दृष्टीने मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि पुनर्रचना करण्यात येत आहे. 1 हजार 300 पेक्षा अधिक मतदारसंख्या असलेल्या ठिकाणी 3 नवीन उप-मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्याचवेळी कमी मतदारसंख्या असलेली 13 मतदान केंद्रे इतर केंद्रांमध्ये विलीन करण्यात आली आहेत. या सुसूत्रीकरणानंतर चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 2 हजार 66 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
31 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि प्रारूप मतदार यादी तयार करण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी संबंधित शासकीय कार्यालयांच्या सूचना फलकांवर तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनाही मतदार याद्यांची सॉफ्ट आणि हार्ड कॉपी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पात्र मतदारांना दावे-हरकतीची संधी
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना आपल्या नावाची तपासणी करण्याची महत्त्वाची संधी मिळणार आहे. ज्या पात्र नागरिकांचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झालेले नसेल, त्यांनी विहित पद्धतीने दावा दाखल करता येणार आहे. तसेच 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकाला वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी मिळणार आहे.
नाव नोंदणीसाठी नमुना क्र. 6
ज्या पात्र नागरिकांचे नाव प्रारूप मतदार यादीत नाही किंवा 1 ऑक्टोबर 2026 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारे नागरिक नवमतदार म्हणून नोंदणी करू इच्छितात, त्यांनी नमुना क्र. 6 अर्ज आवश्यक घोषणापत्र आणि कागदपत्रांसह सादर करावा. मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती करायची असल्यास नमुना क्र. 8 भरता येईल. तर एखादे नाव अपात्र असल्याचा आक्षेप असल्यास किंवा नाव वगळण्याची मागणी असल्यास नमुना क्र. 7 सादर करता येणार आहे.
ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्जाची सुविधा
दावे, हरकती आणि आवश्यक अर्ज मतदार सेवा पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने सादर करता येतील. तसेच संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज सादर करता येणार आहेत.
30 सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार
विशेष सखोल पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना 24 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर 31 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबर 2026 या कालावधीत नोटीस तसेच दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मतदारांनी नाव तपासणे अत्यावश्यक
या संपूर्ण प्रक्रियेमुळे प्रत्येक मतदाराने आपल्या नावाची आणि कुटुंबातील पात्र मतदारांच्या नोंदींची तपासणी करणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः स्थलांतर, दुबार नोंद, पत्ता बदल किंवा अन्य कारणांमुळे नावाबाबत काही समस्या निर्माण झाली असल्यास ती वेळेत दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे.
जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीमध्ये स्वतःचे तसेच आपल्या कुटुंबातील पात्र सदस्यांचे नाव आहे की नाही, याची खात्री करावी. नाव आढळून न आल्यास किंवा मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास 30 सप्टेंबर 2026 पूर्वी विहित नमुन्यात दावे व हरकती दाखल करून आपली नोंद दुरुस्त करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
दरम्यान, 2 लाख 70 हजार 195 मतदार ‘अनकलेक्टेबल’ गटात आल्याने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी या नोंदींची पडताळणी आणि नागरिकांकडून दाखल होणाऱ्या दावे-हरकतींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे 31 ऑगस्टनंतर मतदारांनी यादी तपासून आपले नाव सुरक्षित असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
#Chandrapur #ChandrapurNews #ChandrapurDistrict #VoterList #ChandrapurVoterList #VoterListRevision #SIR2026 #SpecialIntensiveRevision #ElectionCommission #MaharashtraElection #MaharashtraVoterList #VoterRegistration #NewVoters #18PlusVoters #VoterVerification #DraftVoterList #VoterListUpdate #VoterRights #ElectionNews #ChandrapurElection #VoterAwareness #MaharashtraNews #VidarbhaNews #AamchaVidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.