एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
तमिळनाडू राज्यातील त्रिपुर या गावी सोन्या, चांदीच्या दुकानात हातसाफ करून कोट्यावधी रुपयांचा ऐवज घेवून रेल्वे क्रमांक 12578 बागमती एक्स्प्रेसने पलायन करणाऱ्या चोरट्यांचा रेल्वे पोलिसांनी बल्लारपुरात पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून 3 किलो 306.710 ग्रॅम सोने, 27.972 किलो चांदी आणि 14लाख 52 हजार 100 रुपये रोख असा एकूण 2 कोटी 10 लाख 67 हजार 971 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई आज 5 मार्च रोजी करण्यात आली. महताब आलम आयुब खान 37 रा. बागडहरा वॉर्ड क्रमांक 05 जुनीजी अररिया बिहार, बदरूल, जहांगीर खान 20 रा. गमदिया जोकीहाट अररिया बिहार, मोहम्मद सुभान, अब्दुल वहाब 30 रा. बागडाहारा वॉर्ड क्र. 05 जुनीजी अररिया बिहार, दिलकस मो आरिफ 20 रा. गमदिया वॉर्ड क्रमांक 02 जोकिहाट अररिया बिहार अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आज शनिवारी नागपूर रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही रेकॉर्डिंगद्वारे 04 संशयित व्यक्तींनी तमिळनाडू राज्यातील त्रिपुर गावातील सोन्याच्या दुकानातून घरफोडी करून, त्रिपुर ते चेन्नई आणि त्यानंतर चेन्नई येथून रेल्वे ट्रेन क्रमांक 12578 बागमती एक्स्प्रेसने सोने, चांदी आणि रोख रक्कम घेऊन रवाना झाले असल्याची माहिती
दिली. सदर ट्रेन तपासावी व सीसीटीव्ही रेकॉर्डिंग आणि फोटोच्या आधारे आरोपीस पकडण्याचे आदेश दिले. या माहितीच्या आधारे बल्लारशाह रेल्वे स्थानकाचे निरीक्षक एम.के.मिश्रा व चंद्रपूर रेल्वे स्थानक येथील निरीक्षक निरीक्षक नवीन प्रताप सिंग यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक प्रवीण महाजन, उपनिरीक्षक प्रवीण गाडवे, सहायक उपनिरीक्षक गौतम, उपनिरीक्षक राम लखन, कॉन्स्टेबल रामवीर सिंग, कॉन्स्टेबल डीएच दुबल, पो.कॉन्स्टेबल जितेंदर पाटील, कॉन्स्टेबल पवन कुमार, कॉन्स्टेबल शिवाजी कन्नोजिया, कॉन्स्टेबल देशराज मीना, आरक्षक मोहम्मद अन्सारी, हरेंद्र कुमार, रुपेश कुमार, ललित कुमार, श्याम सुंदर पवार यांनी बल्लारशाह स्थानकावर सापळा रचला होता.
वेगवेगळ्या डब्यात लपविला मुद्देमाल
पहिला आरोपी एस 7, दूसरा आरोपी एस 9, तिसरा आरोपी एसी 3 आणि चवथा आरोपी फलाटावर फिरताना आढळून आले. आरोपींनी आपली ओळख लपविण्यासाठी कपडे बदलून चोरीचे साहित्य वेगवेगळ्या डब्यातील वेगवेगळ्या सीटखाली लपवून ठेवले होते. रेल्वे पोलिसांनी आरोपींकडून 05 पिशव्या आणि दोन निळ्या-पिवळ्या गोनी जप्त केल्या. आरोपींसह मुद्देमाल घेऊन पोलीस ठाण्यात आणले. दोन पंच व एक सोनार यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्यासमोर पकडलेल्या व्यक्तींची विचारपूस केली. दरम्यान 3306.710 ग्रॅम सोने, अंदाजे किमत 1,76,57,831 रुपये, 27.972 किलो चांदीची अंदाजे किमत 19,58,040 रुपये आणि रोख 14.52,100 रुपये असा एकूण 2 कोटी 10 लाख 67 हजार 971 रुपयांचा मुद्देमाज जप्त करून आरपीएफच्या ताब्यात घेण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.