- गडचांदूर-वणी राज्यमार्गावर नांदाफाटा येथे वाहतूकीची कोंडी
- नांदाफाटा येथील भाजीपाला व चिकन व्यावसायिक रस्त्यावर
- मोठ्या अपघाताची शक्यता
- अनेक वर्षापासून ट्रॅफिक पोलिस नियुक्त करण्याची होत आहे मागणी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
कोरपना तालुक्यातील गडचांदूर - वनोजा - वणी राज्यमार्गावरील नांदाफाटा शहरातील मुख्य रोडवरील वाहतुकीचा प्रश्न दिवसां दिवस अतिशय बिकट होत चालला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग एवं ग्राम पंचायत प्रशासन कडून यावर कोणतीच कायम स्वरूपी उपाय योजना करण्यात येत नसल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या शहरातील मुख्य व अंतर्गत रस्ते मोठमोठे आहे, परंतु सदर रस्त्यावर व्यापारी तथा फुटफाथवर व्यवसाय करणारे तथा हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांकडून अतिक्रमण होत असल्याने या रस्त्यावरून पायदळ चालणे सुद्धा देखील जिकरीचे झाले आहे. काही दिवसापूर्वी एक महिला भाजी विक्रेतीचा अपघात झाल्याने पाय तुटला होता. आणखी मोठ्या अपघाताची शक्यता असून सार्वजनिक बांधकाम विभागासह नांदा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. आतापर्यंत त्यांच्याकडून कोणतीही उपाय योजना करण्यात आलेले दिसत नाही.
शहरातील खास करून मुख्य रोडवरील अनेक व्यापाऱ्यांनीच अतिक्रमण करित कब्जा करून ठेवला आहे. त्यातच त्यांच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांची वाहने समोर उभी ठेवण्यात येत असते. याबाबत रोड वरील स्थाई दुकानदारांचे म्हणणे असे आहे की त्यांच्या दुकानापुढे अनेक हाथ ठेलेवाले, भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांनी कब्जा केल्या मुळे दुकानात येणाऱ्या ग्राहकांना मोठा त्रास असल्यामुळे तेही आपले दुकान रोडपर्यंत मांडत आहे. त्यासमोर पुन्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला हातगाडीवर भाजीपाला, फळ व विविध वस्तू विकणाऱ्यांच्या गाड्या उभ्या असतात. त्यामुळे वाहन चालकासह पायदळ चालणाऱ्यांना सुद्धा या मार्गावरून मोठी कसरत करावी लागत आहे. दोन वर्षापासून बंद असलेल्या अनेक शाळा कॉलेज सुरू झाल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना या गर्दीतून वाट काढणे खूप कठीण झाले आहे.
हातगाडी, दुचाकी, लहान चारचाकी वाहनांची मोठी गर्दीत असते आणि त्यातच व्यापाऱ्यांचा माल घेऊन येणारी मोठे मोठे अवजड वाहने सुद्धा याच मार्गाच्या कडेला उभी करून माल उतरविला जातो. त्यामुळे मेन रोडवरील दैनंदिन वाहतूक विस्कळीत होतांना दिसून येत आहे. या शहरात सिमेंट कंपनी असल्याने सिमेंट व कोळशाची अवजड वाहने सुद्धा याच मार्गाने चालत असतात. भाजीपाला चिकन व्यावसायिक हॉटेल यांनी संपूर्ण राज्य मार्गावर कब्जा केला असून याठिकाणी मोठ्या अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह ग्रामपंचायतीने लक्ष्य दिवस येथील वाहतूक कोंडी सोडविण्याची गरज आहे.
भाजीपाला चिकन मटण व्यावसायिकांची मजबूरी .
नांदाफाटा बाजारपेठेत भररस्त्यावर भाजीपाला व चिकन मार्केटची दुकाने लागत असल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. या बाबतची विचारणा केली असता नांदा ग्रामपंचायतीने बाजारपेठे करिता कोणतीच जागा उपलब्ध करून न दिल्याने नाइलाजास्तव मजबुरीने आम्हाला रस्त्यावर व्यवसाय करून पोट भरावे लागते. नागरी सुविधा करून देण्यासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध असूनही नांदा ग्रामपंचायत येथील बाजारपेठेची समस्या सोडविण्यास असमर्थ ठरली आहे.
नांदा फाटा चौकात ट्रॅफिक पोलिस नियुक्त करण्याची अनेक वर्षापासून होत आहे मागणी
गडचांदुर-आवारपुर-पिंपळगाव कडे जाणार्या मुख्य रस्त्याच्या चौरस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करुन लहान मोठे व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे चौकात अनेकदा चौकात जाम लागल्याचे दिसून येते. काही वर्षा पूर्वी पिंपळगाव रोडवरील अतिक्रमण हटवून नांदा ग्रामपंचायतीकडून तारांचे कंपाऊंड टाकून झाडे लावण्यात आली होती. परंतु काही स्थानीय नेत्यांच्या आशीर्वादाने आता परिस्थिती जैसे थे तशी झाली असून या ठिकाणाहून जाणे येणे दुभर झाले आहे. नांदा ग्रामपंचायतीचे स्वागत गेटवरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून गेटसमोर रोडवरील भर चौकात अनेक वर्षापासून बंद असलेल्या पानठेल्या समोर अनेकजण कचरा आणून टाकत असल्याने दुर्गंधी होत आहे. त्यामुळे रोडवर ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. नांदा चौकात वाहतूक पोलिस नियुक्त करून देण्याची मागणीही अनेक वर्षापासून होत आहे. स्थानीय पोलिस प्रशासन, ग्राम पंचायत प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग ने जातीने लक्ष देऊन नांदाफाटा चौकात होणाऱ्या वाहनांची कोंडी थांबवावी अशी मागणी स्थानीय नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.