Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शिकारीच्या संशयातून वनकर्मचाऱ्यांकडून गावकऱ्यांना बेदम मारहाण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिकारीच्या संशयातून वनकर्मचाऱ्यांकडून गावकऱ्यांना बेदम मारहाण विवस्त्र करून चार्जिंग बॅटरीद्वारे त्याच्या गुप्तांगाला करंट दिल्याची खळबळजनक ...
  • शिकारीच्या संशयातून वनकर्मचाऱ्यांकडून गावकऱ्यांना बेदम मारहाण
  • विवस्त्र करून चार्जिंग बॅटरीद्वारे त्याच्या गुप्तांगाला करंट दिल्याची खळबळजनक घटना
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
शिकारीच्या संशयातून चिचोली येथील सुमारे सहा गावकऱ्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केली. एकाला विवस्त्र करून चार्जिंग बॅटरीद्वारे त्याच्या गुप्तांगाला करंट दिल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी समोर आली. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून दुर्गापूर पोलिसांनी दोन वनकर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चिचोली परिसरातील शिकारीच्या संशयावरून वनविभागाचे सुमारे आठ कर्मचारी २४ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता गावात आले. त्यांनी ईश्वर रामटेके, हनुमान आसूटकर, संदीप आसूटकर, आकाश चांदेकर यांच्यासह इतर दोघांची शिकारीच्या संशयावरून चौकशी सुरू केली. एवढ्यावरच न थांबता या सर्वांना वनविभागाच्या कार्यालयात नेऊन बेदम मारहाण केली. चार्जिंग बॅटरीद्वारे त्यांच्या हात आणि पायाला करंट दिला.‌ सायंकाळी चंद्रपुरातील रामबाग नर्सरीमध्ये नेऊन त्यांना पुन्हा मारहाण केली. आकाश यांना निर्वस्त्र करून गुप्तांगावर करंट दिल्याचा आरोपही पोलिस तक्रारीतून करण्यात आला आहे. याविषयीची माहिती समजताच गावकऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांना माहिती दिली. गुरुवारी त्यांनी ॲड. फरहत बेग व गावकऱ्यांसोबत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली. लवकरात लवकर दोषींची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तत्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी केली. यानंतर दोन वनकर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना कुठल्या वन्यजीवाच्या शिकारीवरून झाली हे अजूनही समोर येऊ शकलेले नाही. या घटनेसंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top