- रेती तस्करी करणारे पाच ट्रॅक्टर विरूर पोलिसांनी पकडले
- ट्रॅक्टर चालकांना अटक : ट्रॅक्टर मालकांवर काय कारवाही होणार याकडे लोकांचे लक्ष
राजुरा -
राजुरा तालुक्यातील नलफडी या गावाशेजारचा नाल्यातून गेल्या एक महिन्यापासून रेतीचा प्रचंड उपसा सुरू होता, मात्र गावकऱ्यांनी अनेकदा तक्रार करूनही महसूल विभागाचे अधिकारी यांनी काहीही कारवाई केली नाही. अखेर दिनांक 30 ऑगस्ट ला रात्री दोन वाजता नलफडी येथील गावकऱ्यांनी पाच रेती भरलेले ट्रॅक्टर पकडले याबाबत महसूल विभागाच्या अधिकार्यांना फोन द्वारे माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु संबंधितांनी फोन न उचलल्याने अखेर विरुर स्टेशन पोलिसांना कळविण्यात आले. यानंतर विरुर स्टेशन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येवून पाच ट्रॅक्टर वर कारवाई करीत ते ताब्यात घेतले आणि पाच ट्रॅक्टर चालकांना ताब्यात घेतले. याघटनेमुळे अवैध रेतीची तस्करी करणाऱ्या तस्करामध्ये मोठी खळबळ उडाली असून आतापर्यंत आमचे कोणीच काही बिघडवू शकत नाही, आम्ही सर्वांना मॅनेज केले आहे, असे सांगणाऱ्या या लोकांवर कारवाई झाल्याने येथे खळबळ उडाली आहे.
गेल्या एक महिन्यापासून पावसाळ्यात नवीन रेती ओढ्यावर आली असून ही चांगल्या प्रतीची रेती आहे. नलफडी येथील नाला जंगलाला लागून असल्यामुळे चांगल्या प्रतीची व बारीक रेती येथे मिळते. यामुळे कसलीही लीज नसतांना बेकायदेशीर पणे येथील गावकर्यांच्या विरोधाला न जुमानता गेल्या महिनाभरापासून चोवीस तास रेतीची तस्करी सुरू होती. हे वाळू तस्कर बडे आसामी असल्याने महसूल विभागाचे जबरदस्त साटेलोटे यांच्याशी असल्याने सर्व तस्कर चांगलेच निर्ढावले होते. कुणीच आपल्यावर कारवाई करू शकत नाही, अशी या लोकांची धारणा झाली होती. एवढेच नव्हे तर या तस्करांनी गावकर्यांना धमक्याही दिल्या होत्या. अखेर विरूर पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान पोलीस येण्यापूर्वी या तस्करांनी ट्रॅक्टर मधील काही वाळू खाली केल्याची माहिती मिळाली. नलफडी या नाल्यावरून तस्करांनी मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस 24 तास असा रेतीचा उपसा सुरू केला याविषयी अनेकदा गावकऱ्यांनी तक्रार केल्या. महसूल विभागाकडे तक्रार केली परंतु कार्यवाही झाली नाही.
काल रात्री दिनांक 31 ऑगस्ट रोज बुधवार ला रात्री दोन वाजता गावकऱ्यांनी गाड्या पकडल्या आणि विरूर पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार राहुल चव्हाण आणि उपनिरीक्षक सदानंद वडतकर यांनी तातडीने तेथे जाऊन पाच ट्रॅक्टरला ताब्यात घेतले. यातील एका ट्रॅक्टर या दरम्यान फरार झाला. पोलिसांनी ट्रॅक्टर क्रमांक एमएच 34 एल 7316, एमएच 34 एल 3316, एमएच 34 एल 8770, एमएच 34 एपी 0149 व एक नवीन विना क्रमांकाचा असे एकूण पाच ट्रॅक्टर ताब्यात घेतले. या ट्रॅक्टरच्या पाच चालक विजय आत्राम, दिवाकर आत्राम, रमेश बोरकुटे, अमोल सोयाम व अतुल टेकाम यांना अटक केली. या प्रकरणात भारतीय दंड विधान कलम कलम 379,511 व 34 नुसार गुन्हा नोंदवून रीतसर कायदेशीर कारवाई करण्यात आली. ठाणेदार राहुल चव्हाण, उपनिरीक्षक सदानंद वडतकर, विजय लांडे, अतुल चहारे, लक्ष्मीकांत खंडाळे यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकांना तर अटक केली मात्र पोलीस व महसूल प्रशासन ट्रॅक्टर मालकांवर काय कारवाही करणार आता यापुढे लोकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.