Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पटोलेंसारख्या लहान माणसांवर कशाला बोलू - शरद पवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बारामती येथील निवासस्थानी शरद पवारांची पत्रकार परिषद पत्रकारांच्या विविध प्रश्नांना दिली उत्तरे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर ...
  • बारामती येथील निवासस्थानी शरद पवारांची पत्रकार परिषद
  • पत्रकारांच्या विविध प्रश्नांना दिली उत्तरे
  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

पुणे -
स्वबळाच्या घोषणेवरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये बिघाडी झाल्याची सध्या चर्चा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट टीका केल्यानं त्यात भर पडली आहे. या सगळ्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
बारामतीमधील गोविंद बाग येथील निवासस्थानी शरद पवार यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. केंद्र सरकारमधील नवं सहकार खातं, समान नागरी कायद्यापासून ते विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व महाविकास आघाडीतील कुरबुरीपर्यंत सर्व प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली. स्वबळाच्या घोषणेबाबत बोलताना ते म्हणाले, 'प्रत्येक पक्षाला आपली राजकीय भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्र चालवत नाही. पक्ष वेगळेच चालवतो. त्यामुळं काँग्रेसनं राजकीय भूमिका मांडली. शिवसेनेनं मांडली, आमच्या पक्षातून जयंतरावांनी मांडली. प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढवायचा अधिकार आहे. त्यात चुकीचं काहीच नाही.'
नाना पटोले यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर थेट टीका केली होती. 'पुण्याचे पालकमंत्री हे बारामतीकर आहेत. त्यांच्याकडून काँग्रेस कार्यकर्त्यांची कामं केली जात नाहीत, असा आरोप पटोले यांनी केला होता. त्याबाबत विचारलं असता, 'या गोष्टीत मी पडत नाही. नाना पटोले वगैरे ही लहान माणसं आहेत, मी त्यांच्यावर कशाला बोलू? सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी बोललो असतो,' असं पवार म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसचेच!
विधानसभा अध्यक्षपदासाठी माझ्या नावाला तिन्ही पक्षांचा होकार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केलं होतं. त्यावरही पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. 'विधानसभा अध्यक्षपदाबाबत तिन्ही पक्षाचा स्वच्छ निर्णय झाला आहे. हे पद काँग्रेसकडे होतं आणि ते काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळं कुणीही काही बोलायचा संबंधच येत नाही. आम्हाला काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे. त्या निर्णयावर आम्ही सर्वजण कायम आहोत, असं पवार म्हणाले.


Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top