चंद्रपूर-
दि. 14 : सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारीत उद्योगातील कामगारांना किमान समान वेतन लागू केली असल्याने त्यांना अल्प वेतन मिळत आहे. त्यामुळे या परिपत्रकात बदल करून किमान वेतन यादीमध्ये दुरूस्ती करावी व सिमेंट उद्योगातील कामगारांना 21 हजार रूपये किमान वेतन वाढ देण्यात यावी, अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. वडेट्टीवार यांची मागणी लक्षात घेता कामगार मंत्र्यांनी सदर परिपत्रकात बदल करण्याच्या सुचना दिल्या. तसेच कामगारांना 21 हजार रुपये किमान वेतन लागू करण्याचे तत्वतः मान्य करण्यात येत असल्याचे सांगितले.
सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान वेतन वाढ व किमान वेतन परिपत्रकात दुरूस्ती करून किमान नवीन वेतन श्रेणी लागू करण्यासाठी कामगार मंत्री श्री.मुश्रीफ यांच्या दालनात ही बैठक पार पडली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, कामगार आयुक्त श्री.कल्याणकर आदी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात अल्ट्राटेक, माणिकगड, एसीसी, अबूजा व दालमिया हे पाच सिमेंट उद्योग असून यामध्ये किमान 15 ते 20 हजार कामगार काम करीत आहे. सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांना समान किमान वेतन लागू करण्याचे परिपत्रक लागू करण्यात आले आहे. या परिपत्रकाचा आधार घेऊन सिमेंट उद्योगामध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना अल्प वेतन मिळत असल्याची बाब कामगार संघटनेच्या अध्यक्षा शिवानी वडेट्टीवार, विजय ठाकरे, किशोर भोयर, नारोटतं बाराई, सुधाकर तेजाने, गौतम भासरकर, सुनील धावस, दशरथ राऊत आदींनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच कामगारांना किमान 21 हजार रुपये वेतन देण्यात यावे, अशी मागणी केली. संघटनेची मागणी लक्षात घेत श्री. वडेट्टीवार यांनी तातडीने कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे बैठक लावून हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.
त्यानुसार आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत वडेट्टीवार यांनी सिमेंट उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना परिपत्रकाच्या आधारे अल्प वेतन देऊन त्यांचे शोषण होत आहे. वाढती महागाई व कोरोनामुळे नागरिक त्रस्त झाले असून आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे कामगारांच्या किमान वेतनात वाढ करणे आवश्यक आहे. त्यासाठी कामगारांना लागू करण्यात आलेल्या समान किमान वेतन परिपत्रकात बदल करून सिमेंट उद्योगतील कामगारांना नवीन वेतन श्रेणी लागू करणे, 21 हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, कामगारांना कोणत्याही परिस्थीतीत पुरेसे किमान वेतन मिळणे आवश्यक आहे. सध्या कोरोनामुळे कामगार वर्ग अडचणीत आहे. त्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. सिमेंट उद्योगातील ठेका श्रमिकांबाबत किमान वेतन समितीसमोर वेतन वाढीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश श्री. मुश्रीफ यांनी दिले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.