Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आषाढी एकादशी - विठ्ठल नामाचा जयघोष; महत्त्व व मान्यता
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मराठी वर्षातील आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीला महाराष्ट्रात ...
मराठी वर्षातील आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे. पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे दैवत. प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात. गेल्या आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ही वारी सुरू असल्याचे मानले जाते. 'संतकृपा झाली इमारत फळा आली । ज्ञानदेवे रचिला पाया । उभारीले देवालया ।। नामा तयाचा हा किंकर । तेणे केला हा विस्तार । जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ।। तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।', असा महिमा गायला जातो. आषाढी एकादशी म्हटले की, प्रथम डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी. वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीलाही अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, अशी मान्यता आहे. पंढरपूरच्या वारीची थोरवी गावी, ऐकावी तेवढी थोडीच आहे. वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. करोना विषाणू संसर्गामुळे यंदा पायी वारी रद्द करण्यात आली. मात्र, परंपरा सुरू राहावी, यासाठी प्रातिनिधिक वारी साजरी केली जाणार आहे. ठरलेल्या तिथींना आळंदी, देहूहून संतांच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवले. जाणून घेऊया आषाढी एकादशीचे व्रत, महत्त्व आणि वारी परंपरेविषयी...
आषाढी एकादशी आणि व्रत
एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त रहायचे. एकादशीला प्रातःस्नान करायचे. तुलसी वाहून विष्णुपूजन करायचे. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा. रात्री हरिभजन करत जागरण करायचे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी 'श्रीधर' या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते, असे समजले जाते.

आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी
आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, असे सांगितले जाते. अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर. वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले, अशी मान्यता आहे. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. त्यासंदर्भात एक ओवी मिळते, आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी। संत नामदेव महाराजही आपल्या अभंगात म्हणतात, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर। पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत. एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर. कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्त्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे. काशीमध्ये शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूल रूपात अस्तित्व आहे. म्हणूनच इहलोकाची यात्रा संपवण्यापूर्वी एकदा तरी काशीस अथवा पंढरपूरला जावे, अशी इच्छा अनेक जण बाळगून असतात. सप्तपुर्‍यांपेक्षाही थोरवी प्राप्त झालेले हे पंढरपूर आहे, असे सांगितले जाते.

शतकांची वारी
जसे एक तरी ओवी अनुभवावी, असे म्हटले जाते. तसे, एकदा तरी पंढरपूरची वारी करावी, असे आग्रहाने सांगितले जाते. सुमारे ८०० वर्षांपासून वारीची परंपरा अविरतपणे सुरू आहे, अशी मान्यता आहे. आषाढी एकादशीला पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करून वारीला निघतात आणि ते घरी जाईपर्यंत शेत जोमाने वाढण्यास सुरुवात झालेली असते. हे पिकलेले धान्य ज्याप्रमाणे शेतकरी वर्षभर वापरतो, त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो, असे म्हटले जाते.

आषाढी वारीचे महत्त्व
पूर्वीच्या काळी संत एकत्र आले की, प्रत्येक जणच भगवत्‌स्वरूप झालेला असल्याने एकमेकांच्या चरणांवर डोके ठेवून एकमेकांप्रती आदर व्यक्त करत. पायांवर डोके ठेवण्याने अनेक लाभ होतात. दोहोंमधील चैतन्य एक होऊन दोहोंचेही तेज वाढण्यास साहाय्य होते. 'मी'पणा, ताठा, अहंकार न्यून होतो. 'सगळीकडे ईश्वर भरलेला आहे', ही भावना बळावते. आपले अनुभव सांगत, नवीन रचना, अभंग, भजने, ओव्या म्हणून दाखवत. प्रसाराच्या नवीन कल्पना सांगत. इतरांना मार्गदर्शन करत. प्रत्येक जण या मेळाव्यात उपस्थित असल्याचे इतरांना समजावे, यासाठी पताका बाळगत असे. तोच प्रघात आजतागायत सुरू आहे. कार्तिकी एकादशीपासून आषाढी एकादशीपर्यंतच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा देण्याचा अन् पुढील मार्गदर्शन घेण्याचा हा दिवस असल्याने या एकादशीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले, असे सांगितले जाते.

वारीवर अभ्यास
महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरला पायी चालत येतात. करोना संकटामुळे इतिहासात पहिल्यांदा पायी वारी होणार नाही. वारकरी पायी चालत पंढरपूरमध्ये जाणार नाहीत. अनेक शतकांपासून सुरू असलेल्या या परंपरेवर देशातच नाही तर जागतिक स्तरावरही अभ्यास सुरू आहे. वारी अनुभवण्यासाठी जागतिक पातळीवरील अभ्यासक, संशोधक वारीमध्ये सहभागी होत असतात. ही वारी त्यांना अद्भूत आनंदानुभूती देऊन जाते. या दिवशी वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. ज्या विठ्ठलासाठी कित्येक मैल प्रवास चालत केला, त्या दैवताचे भेट झाल्याने आनंदी झालेले हे वारकरी उपवास करतात. जे वारीला जाऊ शकत नाहीत, ते या दिवशी उपवास करुन मनोभावे विठ्ठलाची यथोचित पूजा करतात.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top