- खाणींचा माणसाच्या जिवंतपणावर आणि एकूणच पर्यावरणावर होत असणारा परिणाम यावर चित्रकारी
- राजुरा तालुक्यातील सास्तीच्या मातीतील प्रभाकर पाचपुते या ३५ वर्षांच्या चित्रकाराने साकारलेल्या खाणजीवनावरील चित्रांना वेल्स येथील आर्ट्स मंडी पुरस्कार जाहीर
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सास्ती येथील मूळचे रहिवासी असणारे पाचपुते हे सध्या पुण्यात स्थायिक आहेत. लहानपणापासून त्यांनी आपल्या नातेवाइकांना खाणींशी संबंधित काम करताना बघितले. त्या सगळ्याचा त्यांच्या मनावर ठसा उमटत गेला. पुढे खैरागड आणि बडोदा विद्यापीठातून त्यांनी मूर्तिकलेचे आणि चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले. या काळात त्यांनी खाणजीवनावर बेतलेली चारकोल ड्रॉइंग्ज करायला सुरुवात केली होती. पुढे मुंबईला काम करायला सुरुवात केल्यानंतर त्यांना अशा चित्रांचे प्रदर्शन भरविण्याची संधी मिळाली. या प्रदर्शनामुळे त्यांना ओळखही मिळाली आणि अनेकांनी प्रदर्शनाला भेटीही दिल्या.
पुढील काळात त्यांना आफ्रिका, युरोप तसेच इतर ठिकाणच्या विविध धातूंच्या खाणी आणि तेथील जीवन बघण्याची संधी मिळाली. तेथील लोकजीवनाचे संशोधन करायला आणि खाण संग्रहालयेही बघायला मिळालीत. या वैविध्यपूर्ण अनुभवांतून त्यांनी गेल्या आठ ते दहा वर्षांत खाणचित्रे साकारली. त्याच चित्रांमुळे त्यांना आर्ट्स मंडी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आणि सप्टेंबर २०१९ मध्ये ते संभाव्य पुरस्कार विजेत्यांच्या यादीत निवडले गेले.
"जगभरातील खाणींचा आणि त्यांचा लोकजीवनावर जवळून अभ्यास करता आला. चंद्रपूर जिल्ह्यात तर सगळे बालपण खाणींच्या सहवासात गेले. या खाणविश्वाच्या अंधारात यंत्रे आणि माणसे सारखीच निर्जीव होतात. खाणींचे मानवी जीवनावर, पर्यावरणावर, जमिनीच्या गैरवापरावर सारखेच ओरखडे पडतात. हे कुठेही थांबण्याचे चिन्ह नाही. मला जाणवलेले हे सगळे परिणाम मी चित्रांमधून दाखविले आहे. आधी वेल्सला जाऊन चित्रे काढण्याची संधी मिळणार होती. मात्र, करोनामुळे ते शक्य झाले नाही. मग भारतातच काम करून ४० लहान तैलचित्रे आणि दोन मोठी चित्रे तिकडे पाठवलीत. या पुरस्कारासाठी निवड झाल्याचा आनंद निश्चितच आहे," असे प्रभाकर पाचपुते यांनी सांगितले.

मातीतील कलाकार श्री प्रभाकर पाचपुते यांचे हार्दिक अभिनंदन !
उत्तर द्याहटवा