Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अन् रुग्णालयाचे साडेपाचचे झाले अडीच लाख बिल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रुग्णांची लुबाडणूक थांबवण्यासाठी माजी महापौर संदीप जोशी यांनी घेतला पुढाकार येत्या काळात अनेक रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता आयशा - आमचा ...

  • रुग्णांची लुबाडणूक थांबवण्यासाठी माजी महापौर संदीप जोशी यांनी घेतला पुढाकार
  • येत्या काळात अनेक रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता
आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नागपूर -
रुग्णालयांकडून कोरोना प्रादुर्भावाच्या काळात होत असलेली रुग्णांची लुबाडणूक थांबवण्यासाठी माजी महापौर संदीप जोशी यांनी पुढाकार घेतल्याने येत्या काळात अनेक रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जोशी यांनी हा प्रकार थांबवण्याचे आवाहन केल्यानंतर गुरुवारी एका अशाच तक्रारीची दखल घेत संबंधीत रुग्णाचे ५ लाख ३० हजार रुपयांचे बिल अडीच लाखांपर्यंत आणण्यात आले. यामुळे रुग्णाला मोठा दिलासा मिळाला असून आता यासंदर्भातील अनेक तक्रारी त्यांच्यापर्यंत येऊ लागल्या आहेत.

रुग्णालयांकडून देण्यात येणाऱ्या वाढीव बिलांसंदर्भात जोशी यांच्याकडे अनेक तक्रारी आल्यावर त्यांनी या तक्रारी सोडवण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे बुधवारी जाहीर केले होते. शासनाचे नियम असतानाही रुग्णालयांकडून हा प्रकार सुरू असल्याबद्दल त्यांनी महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर टीकाही केली होती. यात गुरुवारी अशाच एका वाढीव बिलाच्या प्रकरणात टेलिफोन एक्स्चेंज चौकातील सेफ हॅण्ड हॉस्पिटलच्या संदर्भातील तक्रारीची दखल घेत जोशी यांनी ५ लाख ३० हजारांचे बिल २ लाख ५० हजारपर्यंत कमी करून दिले. संबंधित रुग्णालयात कृतिका सोमेश दीपानी या चार दिवस दाखल होत्या. त्यांना रुग्णालयाने चार दिवसांचे ५ लाख ३० हजार रुपयांचे बिल दिले होते. दरम्यान, दीपानी यांनी जोशी यांच्या आवाहनानंतर त्यांच्याशी संपर्क साधला. यासंबंधीची संपूर्ण माहिती जोशी यांनी जाणून घेत बिलाची स्वत: शहानिशा केली. यात रुग्णाची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनाशी संपर्क साधला. दीपानी यांच्या बिलासंदर्भात त्यांच्याकडे जाब मागितला. जोशी यांचा पवित्रा बघून व्यवस्थापनाने आपली चूक मान्य केली. बिलामध्ये दुरुस्ती करून ५ लाख ३० हजाराचे बिल २ लाख ५० हजाराचे करून दिले. कमी झालेल्या बिलामुळे संबंधित रुग्ण आणि कुटुंबियांना दिलासा मिळाला.

शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही, ८० टक्के शासकीय दराने आणि २० टक्के व्यवस्थापनाच्या दराने खासगी रुग्णालयांत नियोजन होत नसल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे. महापालिकेने प्रत्येक रुग्णालयात बिलांचे अंकेक्षण करण्यासाठी अंकेक्षकांची नियुक्ती केली आहे. असे असतानाही खासगी रुग्णालये त्यांना जुमानत नसल्याचे जोशी यांनी म्हटले आहे. दिवसभरात ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या पुढील कार्यवाहीसाठी अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत. त्याचाही नियमित पाठपुरावा करून रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न राहील, असे जोशी यांनी स्पष्ट केले.

नागरिकांच्या बिलासंदर्भात तक्रारी जाणून घेण्यासाठी स्वतः संदीप जोशी हे मनपा मुख्यालयातील सत्तापक्ष कार्यालयात शासकीय सुट्ट्या वगळता दररोज दुपारी ४ वाजता बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top