- विशेष लेख -
- हैदराबाद मुक्तिसंग्राम - एक सोनेरी पान
- आज राजुरा मुक्तिदिन
- राजुरा मुक्ती दिनाचा सोहळा पुढे ढकलला
देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, हैद्राबाद संस्थानात असलेल्या राजुऱ्याला सुमारे १ वष्रे १ महिला दोन दिवस प्रतीक्षा करावी लागली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी चाललेल्या लढय़ात हैद्राबाद संस्थानातील प्रजा मोठय़ा संख्येने सहभागी झाली होती परंतु, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैद्राबाद संस्थानला स्वातंत्र्य मिळाले नाही. मात्र, भारत सरकार व हैद्राबाद संस्थान यांच्यात एक स्थायी करार झाला तरी स्वातंत्र्य अनुभवायला न मिळाल्याने येथील जनतेत आक्रोश निर्माण झाला. स्वामी रामानंदतीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन तीव्र झाले. निजामाचे सैन्य, कासिम रीजवीच्या रझाकारांनी जनतेवर अत्याचार केल्याने प्रक्षोभ निर्माण झाला. हैद्राबाद संस्थानातील शेवटचे गाव असलेल्या राजुरा भागातही स्वातंत्र्यासाठी लोकांनी आंदोलन केले. त्या राजुऱ्यातील इतिहासात, जनतेच्या मनात कायमच्या या घटना कोरल्या गेल्या आहेत. भारताला स्वातंत्र्या मिळाल्यानंतर १३ महिन्याच्या काळात नागरिकांनी निझामाच्या विरोधात आंदोलन करून रझाकारांच्या अत्याचाराच्या विरोधात एल्गार पुकारला. स्वामी रामानंदतीर्थ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या हैद्राबाद मुक्तीसंग्रामात येथील जनता सर्वशक्तीने सहभागी झाली. वरूर रोड येथे तिरंगा ध्वज फडकवल्याबद्दल पंढरी पाटील वडस्कर व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली. स्वातंत्र्य झाल्यानंतर राजुऱ्याचे पहिले आमदार झालेले कोंडा लक्ष्मण बापुजी, पांडूरंग लुथडे, विधान परिषदेचे आमदार शंकरराव देशमुख, विठ्ठलराव बोर्लावार, भय्याजी मेडपल्लीवार, विश्वनाथ उपगन्लावार, रामचंद्रराव धोटे (नलफ डी), पंढरीनाथ वडस्कर, मनोहर ताठे, गणपतराव धोटे (निमणी) यांनी आंदोलनाला दिशा दिली.
भारतीय सैन्याला आदेश मिळताच दक्षिण विभागाचे सैन्य चढाईच्या दोन दिवस पूर्वी बल्लारपूरला दाखल झाले. त्यावेळी बल्लारपूर हे स्वतंत्र्य भारताचे शेवटचे रेल्वे स्थानक होते. यानंतर असलेल्या वर्धा नदीपलीकडे निजामाचे राज्य सुरू होत होते. वर्धा नदीच्या रेल्वे पुलावरून भारतीय सैनिक येणार असल्याची कुणकुण निझामाच्या सैन्याला लागल्याने हा रेल्वे पूल उडवण्याचा प्रयत्न रझाकारांनी केला. मात्र, तत्पूर्वीच भारतीय सैन्य रेल्वेने पूलावर आल्याने हा प्रयत्न असफल झाला. भारतीय सैन्याने पूल परिसरात असलेल्या रझाकारांवर गोळीबार करून यमसदनाला पाठवले. भारतीय सैन्याला राजुरा परिसरात प्रवेश करतांना रझाकारांचा मोठा विरोध होईल, असा कयास होता. मात्र, त्यावेळेच्या तरुणांनी रझाकारांचा विरोध जागीच गाडून टाकल्याने सैन्याचे काम सोपे झाले.
राजुऱ्यात निजामाची मोठी फौज असल्याची माहिती मिळाल्याने १४ सप्टेंबरला राजुऱ्यावर हल्ला करण्याची सैन्याची योजना होती. सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व मेजर गोवानसिंह करत होते. राजुऱ्यात वस्तुस्थिती मात्र विपरीत होती. भारतीय सैन्य आल्याचे समजताच येथील रझाकार हैद्राबादच्या दिशेने पळून गेले. आता राजुऱ्यावर सैन्याचा हल्ला होण्यापूर्वी तातडीने ही माहिती त्यांना देऊन राजुऱ्यातील जनतेचे प्राण वाचवणे आवश्यक होते. गोळीबार, बॉम्बचा वर्षांव अशा परिस्थितीत राजुऱ्यातील विठ्ठल पांडूरंग लुथडे व बाबूराव देवाजी मस्की या दोन बहाद्दर युवकांनी पांढरे बावटे धरून सैन्याच्या दिशेने निघाले आणि भारतीय सैन्याला राजुऱ्यात रझाकार नसल्याची बातमी दिली परंतु, तरीही भारतीय सैन्याने राजुऱ्याला वेढा देऊन खात्री करून घेतली. दुसऱ्या दिवशी तहसील कार्यालयापुढे विठ्ठल लुथडे व बाबुराव मस्की या दोन्ही युवकांचा भारतीय सैन्याने गौरव केला. या काळात राजुऱ्यातील लोकांवर अत्यचार करून रझाकार व निजामाच्या पोलिसांनी अनेक प्रतिष्ठितांना तुरुंगात डांबले. यात रामचंद्रराव धोटे (नलफडी), राजेश्वरराव धोटे, देवाजी धोटे, रामचंद्र धानोरकर, दामोधरराव देशमुख, शंकरराव देशमुख, लक्ष्मणराव देशकर यांचा समावेश होता. अॅड. यादवराव धोटे हे विद्यार्थी असतांना त्यांनी निजाम सरकारच्या विरोधात पत्रके वाटल्याबद्दल खटला चालविण्यात आला.
याच काळात आबाजी पाटील धोटे, विश्वनाथ उपगन्लावार, बालाजी झाडे, गणपतराव धोटे, दत्तुजी राजूरकर, किसनराव बेरड, चिंतामानराव बावणे (कोरपना) आदि कार्यकर्ते भूमिगत झाले. चंद्रपूर कॉंग्रेस समितीशी संपर्क साधून सभा घेणाऱ्यांमध्ये आनंदराव मोहरील यांचा सहभाग होता. १९४७ च्या काळात रझाकारांनी या भागात मोठय़ा प्रमाणात जनतेचा छळ करणे सुरू केले. रझाकारांच्या या जुलमी राजवटीविरुध्द बहुजन समाजाला एकत्र आणण्याचे येथे अनेक प्रयत्न झाले. रझाकारांच्या जुलमाविरुध्द चिडून येथील स्वाभीमानी युवकांनी त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी सशस्त्र दल स्थापन केले. चंद्रपूर येथून बॉम्ब आणून राजुरा येथील निजाम सैनिकांवर टाकण्याचा कट रचण्यात आला. चार्लीचे सदाशिव ताजणे हे बॉम्ब घेऊन आले. निजामाच्या गावातील हस्तकांचे त्यांच्याकडे लक्ष गेल्याने ते तातडीने तहान लागली म्हणून दोन घरांच्या मधून जायला निघाले त्यावेळी ठेच लागून एका बाजूला पडले आणि पिशवीत असलेला बॉम्बचा स्फोट होऊन ते शहीद झाले.
या प्रकरणाची चौकशी करत असतांना निजाम पोलीस विश्वनाथराव उपगन्लावार, गोवरी यांचेकडे पोहोचले. एक बॉम्ब त्यांच्या घरी असावा, असा निजाम पोलिसांचा संशय होता. निजामाच्या पोलिसांनी त्यांच्या घराला वेढा घालून संपूर्ण घर आणि अंगण खोदून काढले परंतु, त्यांना काही मिळाले नाही. खोदकाम सुरू असतांना रझाकारांचा कमांडर व पोलीस अमीन विश्वनाथराव यांच्यावर पाळत ठेवून होते. यावेळी त्यांचे सहकारी रामचंद्र झाडे यांनी एक शक्कल लढवली आणि विश्वनाथराव यांच्या कानात काही सांगितले. रझाकार कमांडरने या घटनेची दखल घेत कुतूहलाने काय आहे म्हणून विचारले तेव्हा रामचंद्रराव यांनी भारतीय सेना अगदी जवळ आल्याचे सांगितले. हे ऐकताच रझाकार शिटय़ा फुंकत पळून गेले. ही संधी बघताच विश्वनाथ व रामचंद्रराव फरार झाले. अखेर पोलीस अॅक्शननंतर निजामाची राजवट संपुष्टात आली. हजारो लोकांच्या बलिदानानंतर हैद्राबाद राज्य निजामांच्या जोखडातून मुक्त झाले. राजुरा हैद्राबाद राज्यासोबतच १७ सप्टेंबर १९४८ ला स्वतंत्र झाले. राजुऱ्याचा हा स्वातंत्र्य लढा भावी काळात कित्येक पिढय़ांना प्रेरणा देत राहील, याविषयी शंका नाही.
गेल्या 14 वर्षापासून राजुरा येथे नियमितपणे आयोजित करण्यात येत असलेला राजुरा मुक्तीदिन सोहळा कोरनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती राजुरा मुक्तीदिन उत्सव समितीने दिली आहे. या दिनानिमित्त गेल्या १४ वर्षापासून राजुरा भूषण पुरस्कार देऊन अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात येतो. दिनांक 17 सप्टेंबर 2020 ला होणारा राजुरा मुक्तीदिन सोहळा आता पुढे ढकलण्यात आला आहे. अशी माहिती राजुरा मुक्तीदिन दिन समितीचे संयोजक यांनी दिली आहे.










टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.