- ओलित ३० लाख व कोरडवाहू शेतीला २५ लाख एकरी मोबदला देण्याची शेतकरी संघटनेची मागणी
कोरपना तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील या जमिनी अत्यन्त सुपीक असून या जमिनीत खाली लाईनस्टोनचे प्रचंड मोठे साठे आहेत. या भुअर्जनानंतर शेतीवर अवलंबून असणारे मालक, मजूर व बारा बलुतेदार तसेच या गावातील शेतीवर उपजीविका असणारे सर्व घटक यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न या प्रकल्पामुळे निर्माण होणार आहे. शिवाय या भागातील बहुअंशी शेतकऱ्यांच्या जमिनी या भोगवटदार नंबर 2 असल्यामुळे त्या शेतमालकांना मोबदला मिळताना काही वाटा आपोआपच सरकारकडे जाण्याची कायदेशीर तरतूद आहे. त्यामुळे या भोगवटदार नंबर दोन असणाऱ्या शेतकऱ्यांनाही भोगावटदार नंबर एक असणाऱ्या शेतकऱ्यांप्रमाणेच दोघेही या व्यवसायात समदुःखी असल्यामुळे भोगावटदार नंबर दोन च्या शेतकऱ्यांनाही भोगावटदार नंबर एक च्या शेतकऱ्यांप्रमाणे वाटप होणे गरजेचे आहे. शिवाय भुअर्जित होणाऱ्या जमिनीचे मालक हे मोठ्या प्रमाणावर आदिवासी आहेत आणि भोगावटदार नंबर दोन ला जमीन असल्यामुळे मोबदला वाटपात त्यांच्यावर होणारा अन्याय मोठ्या स्वरूपाचा आहे. त्यामुळे नंबर एक प्रमाणेच भोगवटदार नंबर दोन च्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मोबदला बरोबरीने देणे न्यायोचित आहे.
भुअर्जित केल्या जाणार्या ओलिताखालील जमिनीला ३० लाख रुपये एकर व कोरडवाहू जमिनीला २५ लाख रुपये एकर प्रमाणे मोबदला देण्यात यावा व त्याचप्रमाणे भोगवटदार नंबर 2 ची जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्या दराने मोबदला देण्यात यावा, "एक सात बारा एक नोकरी" याप्रमाणे सर्व प्रकल्पबाधितांना नोकरीत सामावून घेण्यात यावे, काही जमिनी भुअर्जित करताना पैनगंगा नदीच्या किनाऱ्यापासूनच्या सर्व जमिनींचेच भुअर्जन करण्यात यावे व जमीन जाणाऱ्या गावातील स्थानिकांना वेगवेगळ्या विभागात अग्रक्रमाने नोकरी सामान घेण्यात यावे, अशी मागणी एम.पी.बिर्ला सिमेंट व्यवस्थापन, राज्याचे ना. मुख्यमंत्री, उद्योगमंत्री,ना. महसूलमंत्री व जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते, माजी आमदार एड. वामनराव चटप, अरुण पाटील नवले, प्रभाकर दिवे, निळकंठ कोरांगे, एड. श्रीनिवास मुसळे, प्राचार्य अनिल ठाकुरवार, प्रा.जोत्स्नाताई मोहितकर, सौ.पौर्णिमाताई निरंजने, बंडू पाटील राजूरकर, रमाकांत मालेकर, अविनाश मुसळे, सरपंच संजय येरमे, श्रीमती नंदाताई उलमाले, उपसरपंच प्रभाकर आत्राम, भुमन्ना चुकाबोटलावार, अनंता गोडे, गुलाब तलांडे, शांताराम मंने, गोविंद मेश्राम, प्रेमलाल भगत, रामलू अण्णा, महादेव ढोके, रामलु कोंकीवार, आनंद बांंदूरकर, महादेव खाडे यांनी दिला आहे.






गोविंदपुर गावालगतच्या सर्व जमिनी सुध्दा खरेदी करावीत
उत्तर द्याहटवा