माजी आमदारांच्या पत्नीची पाच जणांविरोधात फसवणुकीची तक्रार
आमचा विदर्भ वृत्तसेवा
राजुरा (दि. ०५ जून २०२६) -
राजुराचे माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. प्रभाकरराव मामुलकर यांच्या पत्नी सुमनताई प्रभाकरराव मामुलकर यांनी आपल्या विश्वासातील नातलगांसह पाच जणांविरोधात तब्बल ५ कोटी रुपयांच्या संपत्तीची फसवणूक करून ती आपल्या नावावर करून घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संपूर्ण राजुरा शहरात या घटनेची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिलेल्या लेखी तक्रारीत सुमनताई मामुलकर यांनी नमूद केले आहे की, पती स्व. प्रभाकरराव मामुलकर यांच्या निधनानंतर प्रकृती अस्वस्थ असल्याने मदतीसाठी बहिणीचा मुलगा अभिजित भुते व त्यांची पत्नी शिल्पा भुते हे राजुरा येथील घरी राहत होते. हळूहळू घरातील सर्व कारभार अभिजित भुते यांच्याकडे गेला. तसेच तेच पेन्शनची रक्कमही काढत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीनुसार, दिनांक २३ मे २०२५ रोजी "जमीन विकत घ्यायची आहे" असे सांगून अभिजित भुते व शिल्पा भुते यांनी सुमनताई मामुलकर यांना राजुरा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नेले. त्या ठिकाणी आशिष नलगे, बबन भुते व धनराज चिंचोलकर उपस्थित होते. त्याच दिवशी तीन विक्रीपत्रे आणि सहा बक्षीसपत्रे तयार करून विविध मालमत्ता संबंधितांच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, अंतरगाव येथील शेती आशिष नलगे यांच्या नावावर, सुबई येथील वसतिगृह अभिजित भुते व शिल्पा भुते यांच्या नावावर, राजुरा येथील रामनगर कॉलनीतील राहते घर अभिजित भुते व शिल्पा भुते यांच्या नावावर, सुबई येथील जागा अभिजित भुते यांच्या नावावर, अंतरगाव येथील शेती अभिजित भुते व शिल्पा भुते यांच्या नावावर, सुबई येथील दोन शेतांपैकी एक अभिजित भुते यांच्या तर दुसरे अभिजित भुते व शिल्पा भुते यांच्या नावावर तसेच अंतरगाव येथील आणखी एक जमीन अभिजित भुते व धनराज चिंचोलकर यांच्या नावावर करण्यात आली. काही व्यवहार बक्षीसपत्राद्वारे तर काही खरेदीखताद्वारे करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या सर्व मालमत्तेची एकूण किंमत ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा दावा सुमनताई मामुलकर यांनी केला आहे. ८४ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक असल्याने आणि प्रकृती ठीक नसल्याचा गैरफायदा घेत आपली फसवणूक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्यांना घराबाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्या चंद्रपूर येथे भाऊ रविकांत निंबाळकर यांच्याकडे राहण्यासाठी गेल्या. तेथे गेल्यानंतर व्यवहाराबाबत संशय आल्याने रविकांत निंबाळकर यांनी संबंधित कागदपत्रांच्या नोंदणीच्या सत्यप्रती मिळविल्या. त्यानंतर मालमत्तेचे व्यवहार आपल्या नावावरून इतरांच्या नावावर झाल्याची बाब समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.
यानंतर दिनांक २८ जून रोजी सुमनताई मामुलकर यांनी भाऊ रविकांत निंबाळकर यांच्यासोबत राजुरा पोलीस ठाण्यात जाऊन अभिजित भुते, शिल्पा भुते, आशिष नलगे, बबन भुते आणि धनराज चिंचोलकर यांच्याविरोधात फसवणुकीची लेखी तक्रार दिली.
या गंभीर आरोपांमुळे राजुरा शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून तक्रारीच्या आधारे पुढील चौकशी सुरू आहे. संबंधित व्यक्तींवर करण्यात आलेले आरोप हे तक्रारदाराचे आरोप असून त्याबाबत संबंधित पक्षाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
"माझी फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून माझे पती माजी आमदार स्व. प्रभाकरराव मामुलकर यांची वडिलोपार्जित संपत्ती, ज्याची मी एकमेव वारस आहे, ती मला परत मिळवून द्यावी. मला खोटी माहिती देऊन जमीन खरेदीसाठी नेल्याचे सांगण्यात आले आणि त्याचवेळी माझ्या नावावरील संपत्ती इतरांच्या नावावर करण्यात आली. त्यानंतर मला मानसिक त्रास देत घराबाहेर काढण्यात आले. वयाच्या ८४ व्या वर्षी मला बेघर करण्यात आले. मला न्याय मिळावा."
– सुमनताई प्रभाकरराव मामुलकर, राजुरा
#Rajura #RajuraNews #Chandrapur #ChandrapurNews #BreakingNews #Mamulkar #SumanTaiMamulkar #PrabhakarraoMamulkar #PropertyFraud #FraudCase #SeniorCitizen #RajuraPolice #MaharashtraNews #CrimeNews #LandFraud #PropertyDispute #CongressLeader #ViralNews #LatestNews #MarathiNews #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.