आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २७ जानेवारी २०२६) -
जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ई-चावडी वाचन उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कैकाडीगुडा तालुका अंतर्गत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. या स्पर्धेत इयत्ता तिसरीचा विद्यार्थी अनिकेत राजकुमार तोडेटीवार याने जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.
गणराज्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते विद्यार्थी अनिकेत राजकुमार तोडेटीवार याला प्रशस्तीपत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्हा परिषद मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची वाचन क्षमता, भाषिक आकलन आणि गुणवत्तावाढ यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी ई-चावडी वाचन हा महत्त्वाचा उपक्रम मानला जातो.
ग्राम पंचायत पाचगाव अंतर्गत येणारे कैकाडीगुडा हे दुर्गम व आडवळणावर वसलेले गाव असून, येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण दिले जाते. या शाळेतील बहुतांश विद्यार्थी गोंडी व तेलगू भाषिक असून, मराठी भाषेशी त्यांचा संपर्क प्रामुख्याने शाळेतील वेळेपुरताच मर्यादित असतो. घर व गाव पातळीवर स्थानिक बोलीभाषेत संवाद होत असतानाही विद्यार्थ्यांनी मराठी वाचन स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल कामगिरी केली, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली आहे.
शाळेचे मुख्याध्यापक विनायक बोंडे आणि सहायक शिक्षक गजानन घिवे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने विविध शैक्षणिक उपक्रम राबविले. वाचन, उच्चार, आकलन आणि सहभागाधिष्ठित शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून त्याचा सकारात्मक परिणाम या यशातून दिसून आला आहे. याच कारणामुळे शाळेला तालुका व जिल्हा पातळीवर ओळख मिळवता आली आहे. शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील संवाद अत्यंत सकारात्मक असून, शिक्षकांनी सामाजिक जाणीव ठेवत पालक व ग्रामस्थांशी सौजन्यपूर्ण संबंध निर्माण केले आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाशी नाते जोडत एक आदर्श निर्माण करण्याचे काम या शाळेत सुरू आहे.
या यशाबद्दल ग्रामपंचायत सदस्य बापुराव मडावी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कविता कुमरे, उपाध्यक्ष किशोर मडावी तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. गटशिक्षणाधिकारी मंगला तोडे, शिक्षण विस्तार अधिकारी विशाल शिंपी, केंद्र प्रमुख कल्पना श्रीकुंडावार यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत शिक्षकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
#ZPSchoolSuccess #EChavadiReading #DistrictLevelAchievement #RuralEducation #StudentAchievement #QualityEducation #EducationInRemoteAreas #GovernmentSchoolPride #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.