आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २६ जानेवारी २०२६) -
चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमत योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या धानाच्या चुकाऱ्याबाबत अखेर मोठा दिलासा मिळणार आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे हा प्रश्न मार्गी लागला असून, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात थेट धानाचे चुकारे जमा होणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात धान खरेदी होऊनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप चुकारे मिळाले नसल्याने गंभीर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही बाब आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनजी भुजबळ यांच्या निदर्शनास आणून देत पत्राद्वारे तातडीने चुकारे अदा करण्याची मागणी केली. यासोबतच अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव अनिल डिगीकर यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा करण्यात आली.
या मागणीची दखल घेत प्रधान सचिव अनिल डिगीकर यांनी शासन स्तरावर आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात येत असून, संबंधित यंत्रणांना निर्देश दिले जातील, असे स्पष्ट केले. येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी विक्री केलेल्या धानाचे चुकारे त्यांच्या खात्यात जमा होतील, असे आश्वासन त्यांनी आमदार मुनगंटीवार यांना दिले. भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष बंडू गौरकार यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनाची तातडीने दखल घेत आमदार मुनगंटीवार यांनी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला.
चंद्रपूर जिल्हा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा असून, 5 डिसेंबर 2025 पासून आधारभूत किंमत योजनेंतर्गत प्रत्यक्ष धान खरेदी सुरू आहे. 2369 रुपये प्रती क्विंटल दराने आतापर्यंत 4,74,286.46 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. या धान विक्रीची एकूण रक्कम 112,35,84,623.74 रुपये इतकी असून, आजपर्यंत शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नव्हते. सध्या रब्बी हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना खत, बियाणे व औषधांसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज आहे. विकलेल्या मालाचे पैसे वेळेवर न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. त्यामुळे देय रकमेचा तातडीने भरणा करण्याची मागणी आमदार मुनगंटीवार यांनी ठामपणे केली.
शासनाकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चुकारा वितरणाची प्रक्रिया पारदर्शक व कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित प्रश्नांवर शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत संवेदनशील भूमिका घेतल्याने पुन्हा एकदा आमदार मुनगंटीवार यांची भूमिका अधोरेखित झाली आहे.
#ChandrapurFarmers #PaddyFarmersRelief #MSP_Payment #FarmerRelief #AgricultureNews #MaharashtraFarmers #PaddyProcurement #sudhirmungantiwar #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.