आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १६ जानेवारी २०२६) -
कडक थंडीने यंदा राजुरा तालुक्यातील जनजीवन अक्षरशः गारठले असून, शाळकरी विद्यार्थ्यांसाठी ही थंडी मोठे आव्हान ठरत आहे. थंडीमुळे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती घटू नये, तसेच शिक्षणात खंड पडू नये, या संवेदनशील सामाजिक जाणिवेतून रोटरी क्लब राजुरा यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी स्वेटर वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवला. हा स्वेटर वाटप कार्यक्रम नेताजी सुभाष चंद्र बोस प्राथमिक शाळा, नगर परिषद राजुरा, पोस्ट ऑफिसजवळ मोठ्या उत्साहात पार पडला. थंडीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा हा कार्यक्रम सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा, सचिव अविनाश जाधव उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब राजुरा अध्यक्ष निखिल चांडक, सचिव राजू गोखरे, माजी अध्यक्ष कमल बजाज, कोषाध्यक्ष अभिषेक गंपावार, शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषाताई येरणे, रोटरी क्लब सदस्य डॉक्टर अमोल कल्लूरवार, सीए आनंद मोहरील, अहमद शेख, अमोल कोंडावार, विनोद चने यांची प्रमुख उपस्थिती होती. यासह शाळेतील संपूर्ण शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब राजुरा सचिव राजू गोखरे यांनी केले. त्यांनी रोटरी क्लबच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्लब कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा सचिव अविनाश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करत रोटरी क्लब राजुरा विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांद्वारे समाजासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे कौतुक केले आणि या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
स्वेटर वाटपावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून उपस्थित पालक भावूक झाले. पालकांनी रोटरी क्लब राजुरा व शाळा प्रशासनाचे आभार मानत समाधान व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषाताई येरणे यांनी विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत यावे, शिक्षणात प्रगती करावी, अशा भावनिक शब्दांत भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमादरम्यान रोटरी क्लबच्या सदस्यांना आपल्या बालपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. विद्यार्थ्यांमध्ये रमून गेलेले रोटरी सदस्य, आनंदी वातावरण आणि समाधानाचे चेहरे यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. या यशस्वी उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. समाजातील गरजू घटकांसाठी असे उपक्रम प्रेरणादायी ठरत असून, रोटरी क्लब राजुरा पुन्हा एकदा सामाजिक जबाबदारी जपताना दिसून आला आहे.
#RotaryClubRajura #WinterRelief #SweaterDistribution #EducationSupport #SocialResponsibility #HelpingHands #StudentsWelfare #CommunityService #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.