आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 15 जानेवारी 2026) -
जन्मजात गहन श्रवणबाधा असतानाही जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण मेहनत आणि संवेदनशील नेतृत्वाच्या पाठबळावर चंद्रपूरच्या अली मुहम्मद रियाझखान घौरी या विशेष बालकाने अखिल भारतीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. गुजरात राज्यातील पोरबंदर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय पाच किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत अलीने द्वितीय क्रमांक मिळवत चंद्रपूर जिल्ह्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव वाढवला आहे.
अली हा द्विपक्षीय कोक्लिअर इम्प्लांट केलेला विशेष बालक आहे. सन 2023 मध्ये त्याच्या एका साऊंड प्रोसेसरमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड झाल्याने तो पूर्णपणे बंद पडला होता. इयत्ता दहावीच्या अत्यंत महत्त्वाच्या शैक्षणिक टप्प्यावर असताना एका प्रोसेसरवर शिक्षण, दैनंदिन व्यवहार आणि जलतरणाचा सराव करणे अलीसाठी मोठे आव्हान बनले होते. साऊंड प्रोसेसरची किंमत लाखोंच्या घरात असल्याने कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते.
ही बाब लक्षात येताच राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मानवीय दृष्टिकोनातून पुढाकार घेतला. शासकीय योजनांमध्ये कोक्लिअर इम्प्लांटनंतर पुन्हा साऊंड प्रोसेसर देण्याची तरतूद नसतानाही, ही परिस्थिती अपवादात्मक असल्याचे ओळखून त्यांनी खनिज निधी अंतर्गत विशेष बाब म्हणून सुमारे सात लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला. या निधीतून अलीसाठी नवीन साऊंड प्रोसेसर उपलब्ध करून देण्यात आला.
नवीन साऊंड प्रोसेसर मिळाल्यानंतर अलीच्या आयुष्याला पुन्हा गती मिळाली. त्याने यशस्वीरित्या इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. हरवलेला आत्मविश्वास परत मिळवत त्याने जलतरण सरावात नव्याने जोमाने सुरुवात केली. या आत्मविश्वासाच्या आणि मेहनतीच्या जोरावर दिनांक 4 जानेवारी रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झालेल्या अखिल भारतीय पाच किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये अलीने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.
सागरी जलतरण ही अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक स्पर्धा मानली जाते. लाटांचा जोर, समुद्रातील प्रवाह आणि दीर्घ अंतर यांचा सामना करत अलीने मिळवलेले हे यश केवळ क्रीडा क्षेत्रातील नसून, विशेष बालकांच्या क्षमतेवर समाजाचा विश्वास अधिक दृढ करणारे ठरले आहे. अलीच्या या यशामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उजळले आहे.
शासनाच्या नियमांच्या चौकटीपलीकडे जाऊन मानवीय संवेदनशीलतेतून दिलेली मदत केवळ आर्थिक स्वरूपाची न राहता, एका विशेष बालकाच्या आयुष्याला नवी दिशा देणारी ठरली आहे. अली मुहम्मद रियाझखान घौरी याच्या या प्रेरणादायी यशामागे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशील नेतृत्वाची मोठी भूमिका असल्याची भावना व्यक्त केली जात असून, समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा दृष्टिकोनाची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
#AliGhauri #ChandrapurPride #SeaSwimming #NationalAchievement #CochlearImplant #InspirationStory #SpecialChild #SwimmingChampion #MaharashtraNews #PositiveLeadership #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.