आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ११ जानेवारी २०२६) -
घुग्घूस परिसरासह वणी व चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलीच्या अनेक कोळसा खाणी कार्यरत असून, त्यांचे मुख्य महाप्रबंधक कार्यालय ताडाळी येथे आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून वेकोलीतील विविध अधिकाऱ्यांमार्फत खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांची कामे केली जातात. मात्र काही वर्षांपासून कामगार वर्गामध्ये एक गंभीर चर्चा दबक्या आवाजात सुरू होती की, काही पदाधिकारी आणि नेते लाच घेतल्याशिवाय कामे करून देत नाहीत.
अशाच एका प्रकरणात कोळसा खाणीत काम करणाऱ्या एका कामगाराकडून काम करून देण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याची बाब समोर आली. संबंधित कामगाराने लाच देण्यास नकार देत थेट केंद्रीय अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत सीबीआयने सखोल चौकशी करत सापळा रचण्याचा निर्णय घेतला.
शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास सीबीआयच्या पथकाने राजीव रतन रुग्णालय परिसरात सापळा रचला. याच दरम्यान वेकोली वणी क्षेत्रातील HMS संघटनेचे क्षेत्रीय अध्यक्ष दीपक जयस्वाल यांना 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या थरारक कारवाईमुळे संपूर्ण वणी, घुग्घूस आणि चंद्रपूर परिसरात एकच खळबळ उडाली.
अटकेनंतर सीबीआयच्या पथकाने रामनगर परिसरात असलेल्या दीपक जयस्वाल यांच्या निवासस्थानी झडती घेतल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याशिवाय नागपूर, पुणे आणि यवतमाळ येथेही जयस्वाल यांची मालमत्ता असल्याची माहिती समोर येत असून, त्या ठिकाणीही सीबीआयकडून चौकशी आणि झडतीची प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या कारवाईमुळे वेकोली प्रशासन, कामगार संघटना आणि कोळसा खाण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक वर्षांपासून कामगारांकडून लाच मागितली जात असल्याच्या चर्चांना या अटकेमुळे दुजोरा मिळाल्याची भावना कामगार वर्गातून व्यक्त होत आहे. अनेक कामगारांनी आता उघडपणे तक्रारी करण्याचे धाडस दाखवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून अधिक खोलात नेला जाणार असून, या लाचखोरी प्रकरणामागे आणखी कोणी सहभागी आहे का, इतर खाणींमध्येही असे प्रकार सुरू आहेत का, याचा शोध घेतला जाणार आहे. या घटनेनंतर वेकोलीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासन आणि संघटनांची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#WCL #CBIAction #BriberyCase #CoalMines #Ghugus #Wani #Chandrapur #BreakingNews #AntiCorruption #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.