बल्लारपूर (दि. ११ जानेवारी २०२६) -
बल्लारपूर शहरातील टेकडी विभागात वाढती गुन्हेगारी, दहशत आणि अवैध धंद्यांमुळे नागरिकांचे जनजीवन असुरक्षित बनले असून, या पार्श्वभूमीवर लवकरच या भागात स्वतंत्र पोलीस चौकी उभारली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी टेकडी परिसरात पोलीस चौकी उभारण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृह विभागाकडून विशेष मंजुरी घेण्याचे आश्वासन दिले आहे.
8 जानेवारी रोजी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन भाजपा कामगार मोर्चा प्रदेश महासचिव अजय दुबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने टेकडी विभागात पोलीस चौकी बांधण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, या विषयासंदर्भात मुख्यमंत्री तथा गृह मंत्री आणि जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना पत्र देऊन प्रत्यक्ष भेट घेण्यात येईल. नागरिकांना भयमुक्त करण्यासाठी शक्य तितक्या लवकर पोलीस चौकी कार्यान्वित करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. गरज भासल्यास आगामी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. टेकडी परिसरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
टेकडी परिसरात गेल्या काही काळापासून गुंडगिरी, मारहाण, हत्या, अवैध दारू विक्रीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. काही विशिष्ट वस्त्यांमध्ये अवैध कत्तलखाने उघडपणे सुरू असून, बेकायदेशीररित्या गोवंशाची खरेदी करून येथे कत्तल केली जात असल्याचे गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहेत. या प्रकारांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सर्व पोलीस चौक्या आलापल्ली मार्गावरील राज्य महामार्गालगत असल्याने टेकडी परिसरात तातडीची मदत मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे गुन्हेगारी घटनांवर वेळीच नियंत्रण मिळवणे कठीण जात असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर टेकडी विभागात स्वतंत्र पोलीस चौकी उभारणे अत्यावश्यक बनले आहे.
यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनीही पोलीस चौकी स्थापनेबाबत ठोस आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आता आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आश्वासनामुळे टेकडी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या शिष्टमंडळात प्रदेश भाजयुमो सचिव मिथिलेश पांडे, मन्सूर खान, अयूब खान, वसंत आक्केवार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. टेकडी परिसरातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी प्रशासन आता नेमकी कोणती पावले उचलते, याकडे संपूर्ण बल्लारपूर शहराचे लक्ष लागले आहे.
#Ballarpur #TekdiArea #PoliceOutpost #PublicSafety #CrimeControl #ChandrapurNews #LawAndOrder #MaharashtraNews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.