राजुरा (दि. ११ जानेवारी २०२६) -
राजुरा तहसील अंतर्गत ग्राम पंचायत चुनाला परिसरात राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान भीषण आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जोगापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम एका खासगी कंपनीमार्फत सुरू असताना 8 जानेवारी 2026 च्या रात्री अत्यंत गंभीर आणि संशयास्पद घटना घडली.
पर्यावरणाशी संबंधित काही जागरूक नागरिकांना रात्रीच्या सुमारास महामार्ग परिसरात प्रचंड तेजस्वी प्रकाश दिसून आला. त्यामुळे झाडांची अवैध तोड किंवा कोणतीतरी संशयास्पद हालचाल सुरू असल्याची शंका निर्माण झाली. नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, महामार्गालगत नंबर प्लेट नसलेला एक महिंद्रा ट्रॅक्टर उभा असल्याचे आढळून आले.
ट्रॅक्टरजवळील मजूर पळून गेले होते. घटनास्थळी केवळ एकच मजूर उपस्थित होता. संशय वाढल्याने नागरिकांनी ट्रॅक्टरवर ठेवलेल्या सिमेंटच्या गोण्यांची तपासणी केली असता, त्यामध्ये एक्सप्लोडर आणि स्लरी एक्सप्लोसिव्हसारखी औद्योगिक स्फोटके आढळून आली. ही बाब लक्षात येताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
नागरिकांनी तात्काळ 112 क्रमांकावर संपर्क साधून राजुरा पोलिसांना माहिती दिली तसेच लेखी तक्रारही दाखल केली. दुसऱ्या दिवशी कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्याशी विचारणा करण्यात आली असता, सुरुवातीला त्यांनी हे स्फोटक खड्डे करण्यासाठी वापरले जात असल्याचे सांगितले. मात्र नंतर त्यांनीच अचानक भूमिका बदलत ही स्फोटके आमची नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे चौकशी केल्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की रस्ता बांधकामासाठी स्फोटक वापरण्याची कोणतीही परवानगी संबंधित कंपनीला देण्यात आलेली नाही. तहसीलदारांकडे माहिती दिल्यावर त्यांनी स्फोटक आणि शस्त्रांशी संबंधित प्रकरण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येत असल्याचे सांगत आपली जबाबदारी नाकारली. यानंतर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकारी यांनाही घटनेची माहिती देण्यात आली. बराच वेळ उलटून गेल्यानंतर अखेर पोलीस निरीक्षक राजुरा सुमित परतेकी, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी ट्रॅक्टरवरील स्फोटकांनी भरलेल्या सिमेंटच्या गोण्या जप्त केल्या आणि नंबर प्लेट नसलेला ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिले. कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे पुन्हा चौकशी केली असता त्यांनी पुन्हा एकदा हे साहित्य आमचे नसल्याचा दावा केला. पोलिसांनी कंपनीच्या परवानग्यांची तपासणी करून दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
10 जानेवारी 2026 पर्यंत या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलेली नाही. भारतात स्फोटकांच्या साठवणूक, वाहतूक आणि वापरासाठी पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन आणि मुख्य नियंत्रक स्फोटक कार्यालयाची परवानगी अनिवार्य आहे. ब्लास्टर प्रमाणपत्र, जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी, पोलीस व अग्निशमन विभागाची ना हरकत प्रमाणपत्रे आणि अधिकृत साठवणूक स्थळ अशा अटी कायद्याने आवश्यक आहेत.
या सर्व परवानग्यांशिवाय राष्ट्रीय महामार्गावर स्फोटके आढळणे हा गंभीर गुन्हा आहे. या पार्श्वभूमीवर गडचांदूर येथील जुनी भीषण घटना आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. काही वर्षांपूर्वी गडचांदूर बसस्थानकाजवळील भगवती कापड दुकानात बॉम्ब ठेवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाला होता. तो बॉम्ब नंतर विदर्भ शाळेच्या परिसरात निकामी करण्यात आला होता.
अशा घटनांचा विचार करता, चुनाला येथील स्फोटक प्रकरण अत्यंत गंभीरतेने घेणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात मोठ्या आणि जीवघेण्या दुर्घटनेचा धोका नाकारता येत नाही. जर ही स्फोटके कंपनीची नसतील, तर ती आली कुठून, कोणी आणली, कोणासाठी आणि कशासाठी, हे सर्व प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आता संपूर्ण राजुरा तहसीलचे लक्ष प्रशासन या गंभीर प्रकरणाकडे किती गांभीर्याने पाहते, याकडे लागले आहे.
#Rajura #Chunala #HighwayConstruction #ExplosivesCase #IllegalExplosives #PublicSafety #PoliceInvestigation #MaharashtraNews #BreakingNews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.