पीडित शेतकरी रोशन कुले यांनी मांडली छळाची कहाणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
नागभीड /चंद्रपूर (दि. ०९ डिसेंबर २०२६) -
अवैध सावकारांच्या अमानुष छळामुळे नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील एका तरुण शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशभरात शेतकऱ्यांच्या भयावह आर्थिक स्थितीचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रकरणामुळे ग्रामीण भागातील सावकारशाही, प्रशासनाची उदासीनता आणि शेतकऱ्यांच्या असहायतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणातील पीडित शेतकरी रोशन कुले यांना घेऊन काँग्रेस नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी चंद्रपूर येथील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी रोशन कुले यांनी अवैध सावकारांकडून गेल्या काही वर्षांत झालेल्या मानसिक, आर्थिक व सामाजिक छळाची हृदयद्रावक आपबीती माध्यमांसमोर मांडली.
रोशन कुले यांनी सांगितले की, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. पत्नीने स्वतःचे मंगळसूत्र विकले, मुलीच्या कानातील रिंगसुद्धा गहाण ठेवली, मात्र तरीही सावकारांचा छळ थांबला नाही. उलट सावकारांना राजकीय आशीर्वाद असल्याने त्यांची दादागिरी वाढतच गेली, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
सावकारांकडून वारंवार धमक्या, अपमानास्पद वागणूक आणि दबाव सहन करत अखेर कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याचा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याचे रोशन कुले यांनी सांगितले. त्यांनी पुढील दोन दिवसांत काही अवैध सावकारांचे राजकीय व सामाजिक संबंध उघड करण्याचा दावा देखील यावेळी केला.
पत्रकार परिषदेत उपस्थित आमदार विजय वडेट्टीवार यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. कर्ज फेडण्यासाठी एका शेतकऱ्याला स्वतःचा अवयव विकावा लागतो, ही घटना महाराष्ट्रासाठी अत्यंत लज्जास्पद व निंदनीय आहे, असे त्यांनी सांगितले. सावकारशाहीविरोधात कठोर कारवाई झाली नाही, तर अशा घटना वाढतच जातील, असा इशाराही त्यांनी दिला.
शासनाने अवैध सावकारांवर कठोर कारवाई करावी, पीडित शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक व वैद्यकीय मदत द्यावी, तसेच या प्रकरणातील सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली. या घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या वास्तव समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या असून, शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#FarmerCrisis #FarmerSuicide #IllegalMoneyLenders #AgrarianCrisis #DebtTrap #FarmersOfIndia #JusticeForFarmers #Chandrapur #Nagbhid #Minthur #Maharashtra #RuralDistress #MLA #VijayWadettiwar #farmar #roshankule #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.