आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (०९ जानेवारी २०२६) -
राजुरातील सामाजिक कार्यात अग्रणी असलेल्या प्रेमांजली महिला बहुउद्देशीय संस्था राजुरा यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून विसापूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात भव्य आरोग्य तपासणी व औषधी वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेत सामाजिक बांधिलकीचा आदर्श वस्तुपाठ सादर करण्यात आला.
या शिबिरात अरके ग्रामीण रुग्णालय राजुरा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता लहू कुळमेथे आणि सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. वाणी उमाकांत धोटे यांनी वृद्धांशी स्नेहपूर्ण संवाद साधत त्यांची सविस्तर आरोग्य तपासणी केली. रक्तदाब तपासणीसह विविध आजारांवर मोफत औषध गोळ्यांचे वितरण करण्यात आले. वृद्धाश्रमातील रहिवाशांनी या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली.
ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य, मानसिक समाधान आणि आत्मीय संवाद यांचा समतोल साधत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अनेक वृद्धांनी आपल्या आरोग्यविषयक तक्रारी डॉक्टरांसमोर मोकळेपणाने मांडल्या, तर डॉक्टरांनी संयमाने मार्गदर्शन करून औषधोपचार सुचवले. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेच्या संचालक अध्यक्षा प्राध्यापक चित्रलेखा धंदरे यांनी केली. त्यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी महिलांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन रंजनी बोढे यांनी केले. त्यांनी संस्थेच्या सर्व सदस्यांचे सहकार्य आणि डॉक्टरांच्या सेवाभावी भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्षा मीना डांगे, प्राध्यापक भावना रागीट, प्राध्यापक कल्पना जामुनकर, बेबीताई पटकोटवार, सुनिता कुभांरे, लक्ष्मी बोबाटे, चंदा ओजा यांच्यासह संस्थेच्या अनेक सदस्यांनी नियोजन, अंमलबजावणी आणि वृद्धांच्या सेवेसाठी मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमामुळे केवळ आरोग्य तपासणीपुरतेच नव्हे तर वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. समाजातील ज्येष्ठ नागरिकांकडे संवेदनशीलतेने पाहण्याचा संदेश देणारा हा उपक्रम राजुरा तालुक्यात कौतुकाचा विषय ठरत आहे.
#HealthCamp #FreeHealthCheckup #ElderCare #SeniorCitizens #OldAgeHome #CommunityHealth #WomenLedInitiative #SocialService #SocialResponsibility #WomenEmpowerment #SavitribaiPhuleJayanti #RajmataJijauJayanti #Rajura #Vidarbha #Maharashtra #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.