आमचा विदर्भ - दीपक शर्मा
विरूर स्टेशन (दि. ०७ जानेवारी २०२६) -
राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन परिसरातील अमृतगुडा शिवारात वाघाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एका शेतकऱ्याच्या गायच्या बछड्याची बडी घेण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विरूर स्टेशन परिसरातील अमृतगुडा शिवारात वास्तव्यास असलेले शेतकरी गौतम आत्माराम ताडे यांच्या मालकीच्या गायच्या बछड्यावर अचानक वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात बछड्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळच्या सुमारास शिवारात ही घटना घडल्याचे सांगण्यात येत असून, हल्ल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गौतम आत्माराम ताडे हे अल्पभूधारक शेतकरी असून पशुधनावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. या घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून कुटुंबावर उपजीविकेचे संकट ओढावले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अमृतगुडा व परिसरातील शेतकरी व मजूर शिवारात जाण्यास घाबरत असून, वाघाचा मुक्त संचार वाढल्याने मानवी जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा तसेच वाघाच्या हालचालींचा तात्काळ मागोवा घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी गौतम आत्माराम ताडे यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी ठाम मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. परिसरात वाघाच्या हल्ल्याच्या घटना वाढत असल्याने वनविभागाने योग्य उपाययोजना कराव्यात, पिंजरे लावावेत, गस्त वाढवावी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीची पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
#TigerAttack #WirurNews #RajuraTaluka #ForestDepartment #FarmerLoss #WildlifeConflict #CompensationDemand #RuralNews #MaharashtraNews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.