आमचा विदर्भ - दीपक शर्मा
गडचांदूर (दि. ०५ जानेवारी २०२५) -
गडचांदूर शहरात गरीबांच्या हक्काच्या सरकारी धान्यावर खुलेआम डल्ला मारला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, धान्य मागण्याचे धाडस करणाऱ्या कार्डधारकाला थेट मारहाण करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. राशन दुकानात धान्याऐवजी दादागिरी, गैरव्यवहार आणि मारहाण सुरू असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
गडचांदूर शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत दुकान चालक बापूराव गोरे यांच्यामार्फत चालविण्यात येणाऱ्या शासकीय राशन दुकानात कार्डधारकांना नियमाप्रमाणे गहू देण्यात येत नसल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. दुकानात गहू उपलब्ध नसल्याचे कारण सांगून केवळ तांदूळ देण्यात येत असून, मात्र शासकीय पोर्टलवर गहू व तांदूळ दोन्ही वितरण झाल्याची नोंद होत असल्याने संशय आणखी गडद झाला आहे.
या प्रकरणात राशन कार्डधारक अमोल ठमके हे धान्य घेण्यासाठी दुकानात गेले असता, त्यांना नियमाप्रमाणे गहू व तांदूळ मिळणे अपेक्षित होते. मात्र दुकान चालकाने गहू नसल्याचे सांगून केवळ ६ किलो तांदूळ देत त्यांना परत पाठवले. घरी गेल्यानंतर अमोल ठमके यांनी मेरा राशन ॲप तपासले असता, त्यात ६ किलो तांदूळ आणि ६ किलो गहू दिल्याची नोंद असल्याचे दिसून आले. या गंभीर गोंधळाबाबत जाब विचारण्यासाठी अमोल ठमके पुन्हा दुकानात गेले असता, उत्तर देण्याऐवजी दुकान चालकाने तू फार हुशार आहेस का असे म्हणत थेट गालावर थप्पड मारल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता, नियमांचे उल्लंघन करत धान्याची पावती देण्यासही दुकान चालकाने स्पष्ट नकार दिला.
स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, हा एकटाच प्रकार नसून गडचांदूर शहरातील अनेक शासकीय राशन दुकानांमध्ये अशीच मनमानी आणि काळाबाजारी सुरू आहे. गरीबांचा धान्य कोटा कमी देऊन किंवा रोखून तो खुले बाजारात विकला जात असल्याचा आरोप कार्डधारकांकडून करण्यात येत आहे. प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा रोष व्यक्त होत आहे.
या प्रकरणाबाबत गोदाम प्रभारी कांबले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित राशन दुकानात प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेण्याचे सांगितले होते. मात्र दोन दिवस उलटून गेले तरी त्यांनी भेट दिली नाही किंवा कोणतेही समाधानकारक उत्तर दिलेले नाही. नियमांनुसार धान्य कमी देणे, चुकीची नोंद करणे किंवा पावती न देणे, अशा प्रकरणात संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची तरतूद आहे. तरीही गडचांदूरमध्ये गरीबांच्या हक्काच्या धान्याची लूट सुरूच असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, गहू मागितल्यावर मारहाण केल्याच्या आरोपावर दुकान चालक बापूराव गोरे यांनी स्पष्टीकरण देताना संबंधित युवक दारू पिऊन आला होता व शिवीगाळ करत होता, असा दावा केला आहे. तसेच तहसील अंतर्गत धान्य गोदामाकडून गहू कमी मिळत असल्याने गहू वाटप करता आले नाही, असेही त्यांनी सांगितले. मात्र गहूच मिळत नसेल तर शासकीय पोर्टलवर गहू वितरण झाल्याची नोंद कशी होत आहे, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
#Gadchandur #RationScam #PublicDistributionSystem #FoodGrainLoot #RationShopCorruption #JusticeForPoor #BreakingNews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.