आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १७ जानेवारी २०२६) -
राजुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या साठवून ठेवलेल्या लाखो रुपयांच्या डिझेल साठ्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत डिझेलसह बोलेरो कॅम्पर वाहन जप्त केले. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध इंधन साठवणूक व वाहतुकीचे गंभीर प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आले आहेत.
दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॅम्प क्रमांक १७ सास्ती परिसरात ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून बोलेरो कॅम्पर वाहन क्रमांक एम.एच. ३४ – बीझेड – ८६६५ द्वारे अवैधरित्या साठवून ठेवलेला तब्बल १०२० लिटर डिझेलचा साठा जप्त केला. सदर वाहनाचा चालक हा फरार असून त्याचे अन्य दोन ते तीन साथीदार असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिस तपासात संबंधित आरोपींनी कोणतीही शासकीय परवानगी नसताना, लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपणे व कोणताही सुरक्षात्मक बंदोबस्त न करता मोठ्या प्रमाणात डिझेलचा साठा केल्याचे आढळून आले. या ठिकाणी पंचनामा करून अंदाजे ९,९१,८०० रुपये किमतीचा डिझेल साठा, साठवणुकीसाठी वापरण्यात आलेली बोलेरो कॅम्पर गाडी तसेच प्लास्टिक कॅन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात अप.क्र. १८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८७ व ३ (५) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, चंद्रपूर मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, राजुरा सुमित परतेकी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. गुन्हे शोध पथक इन्चार्ज पोलीस उपनिरीक्षक दिपक ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक पराग उल्लेवार, सहायक फौजदार किशोर तुमराम, पोलीस हवालदार पुंडलिक परचाके, विक्की निर्वाण, महेश बोलगोडवार, मिलिंद जांभूळे, शफीक शेख यांनी या धडक कारवाईत सक्रिय सहभाग घेतला. राजुरा परिसरात अवैध इंधन साठवणूक व वाहतुकीचे प्रकार वाढत असताना, पोलिसांनी केलेली ही कारवाई इंधन माफियांना स्पष्ट इशारा मानली जात आहे.
#RajuraPolice #DieselSeizure #IllegalFuel #CrimeNews #ChandrapurPolice #FuelMafia #PoliceAction #BreakingNews #LawAndOrder #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.